(जिल्हा बँक लाेगो)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रारूप यादी उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. १३ सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर हरकती घेता येणार असून, त्यावर सुनावणी घेऊन २२ सप्टेंबरपर्यंत त्याचा निकाल द्यावा लागणार आहे. पात्र सभासदांची यादी २७ सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्राथमिक संस्थांकडून विहीत मुदतीत संस्था प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मागवले होते. बँकेशी ११४४८ संस्था संलग्न आहेत. मात्र, त्यातील ८५७१ संस्थांनी आपल्या प्रतिनिधींची नावे ठराव पाठवले. या दाखल ठरावांची छाननी बँक व सहकार विभागाच्या पातळीवर झाली. यामधून अवसायक व नोंदणी रद्द झालेल्या संस्थांच्या प्रतिनिधींना अपात्र ठरवण्यात आले. पात्र ७५९८ संस्था प्रतिनिधींची यादी सहकार विभागाने तयार केली असून ही प्रारूप यादी उद्या, सकाळी अकरा वाजता जिल्हा बँक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय व विभागीय सहनिबंधक कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.
या यादीवर १३ सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहेत. दाखल झालेल्या हरकतीवर २२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेऊन निकाल द्यायचा आहे. अंतिम यादी २७ सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडू शकते.
दरम्यान, सांगली व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रारूप यादी उद्या विभागीय कार्यालयासह त्या बॅंकेत व तेथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.