कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून शेतकऱ्यांना आता एकरी ५० हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे. जिल्हास्तरीय शेतीतज्ज्ञ समितीची शनिवारी जिल्हा बॅँकेत सभा झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीयीकृत बँका एकरी ५० हजारांचे पीक कर्ज देत असल्याने जिल्हा बॅँकेनेही एवढेच पीक कर्ज द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्हायची, त्यामुळे बॅँकेने हा निर्णय घेतला. जिल्हा बॅँक एकरी ३६ हजार रुपये पीक कर्ज देत होती; पण कर्ज परतफेडीची क्षमता असल्याने त्यांना जादा कर्ज मिळावे यासाठी शेतकरी आग्रही होता. राष्ट्रीयीकृत बॅँका शेतकऱ्यांची परतफेडीची कुवत पाहून एकरी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देतात. जिल्हा बॅँकेनेही कर्ज द्यावे, अशी मागणी गेले दोन-तीन वर्षे सर्वसाधारण सभेत केली जात होती. जिल्हास्तरीय शेतीतज्ज्ञ समितीची बैठक शनिवारी जिल्हा बॅँकेत झाली. यामध्ये आगामी २०१६-१७ सालासाठी शेतकऱ्यांना इतर बॅँकांप्रमाणे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. ऊस पिकासाठी हेक्टरी एक लाख २५ हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे. यापैकी ९० हजार रुपये सवलतीच्या व्याजदराने, तर उर्वरित ३५ हजार रुपये बॅँकेच्या प्रचलित व्याजदराने दिले जाणार आहे. सोयाबीन, भात, केळी, द्राक्षे, झेंडू, बटाटा, टोमॅटो, भुईमूग, आदी पिकांसाठीही कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या बैठकीला जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, संचालिका निवेदिता माने, जिल्हास्तरीय शेतीतज्ज्ञ समितीचे सदस्य मच्छिद्र कुंभार, रावसाहेब पुजारी, सूर्याजी पाटील, दिलीप मगदूम, पी. डी. पाटील, नाबार्डचे जिल्हा समन्वयक नंदू नाईक, कृषी महाविद्यालयाचे प्रा. आर. आर. सूर्यवंशी, राज्य बॅँकेचे अधिकारी, जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची मागणी पाहून हा निर्णय घेतला. यापूर्वी एकरी ३६ हजार देऊन उर्वरित रक्कम आपण ‘खावटी’ कर्ज देत होतो. - प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक
जिल्हा बँँकेचे आता एकरी ५० हजार पीक कर्ज
By admin | Published: November 01, 2015 12:45 AM