कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एप्रिल २०२१ पासून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. केंद्र सरकारच्या अपात्र कर्ज माफी रद्द केल्याने अनिष्ट दुराव्यात सापडलेल्या विकास संस्थांची व्याज आकारणी बंद करूच, त्याचबरोबर नाबार्डने व्याजासह पैसे दिले तर तेही संस्थांना परत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या ‘ई लॉबी’ भूमिपूजन, मोबाईल व्हॅन, यूपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम या सुविधांचा प्रारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. मायक्रो एटीएमचे वाटप करण्यात आले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, बँकेचा नफा वाढला की त्यावर आयकर वाढत आहे. त्यात शेतकऱ्यांना काही तरी मदत करा, अशी सूचना आमदार पी. एन. पाटील यांची होती. त्यामुळे तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या ५ फेब्रुवारीच्या वार्षिक सभेत त्यास मान्यता घेऊन एप्रिल २०२१ पासून त्याची अंमलबजावणी करणार आहे.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, राज्य बँकेच्या अगोदर कोल्हापूर जिल्हा बँकेने अद्ययावत सुविधा ग्राहकांना दिली. नवीन तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांनी आत्मसात करून शेतकऱ्यांना समजावून सांगावे. सर्वच विकास संस्थांना मायक्रो एटीएम द्यावे. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी स्वागत केले. आयटी विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संचालक भैया माने यांनी आभार मानले. यावेळी आमदार राजेश पाटील, निवेदिता माने, के. पी. पाटील, अनिल पाटील, बाबासाहेब पाटील, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, विलास गाताडे, असिफ फरास, आर. के. पोवार, अर्चना पाटील, उदयानी साळुंखे उपस्थित होते.
नाबार्डचा बँकेला हात
नाबार्डने यापूर्वी एक मोबाईल व्हॅन बँकेला दिली आहे, आता तीन व्हॅन दिल्या. जिथे बँकेच्या शाखा नाहीत, त्याठिकाणी बँकिंगसाठी ३०० मायक्रो एटीएम दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी नाबार्डची कृतज्ञता व्यक्त केली.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘केडीसीसी’ सर्वात पुढे
डिजिटल प्लॅटफॉर्मवर केडीसीसी बँक सर्वात पुढे असल्याचे ‘नाबार्ड’चे नंदू नाईक सांगितले. तर सहा वर्षे मेहनत घेतल्याने बँक सक्षम झाली. यापुढेही नेटाने काम करा आणि ‘केडीसीसी’ला देशातील नंबर वनची बँक करा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
घरच्याने तपासणी केली तर भांडणे होतात
तीन-चार महिन्यांत मुंबईत बदली होणार असली तरी माझे लक्ष केडीसीसीवर राहील, असे ‘नाबार्ड’चे नंदू नाईक यांनी सांगितले. यावर बँकेची तपासणी तेवढी करून जावा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तपासणी नको, घरच्या माणसाने तपासणी केली तर भांडणे होतात, असा चिमटा नाईक यांनी काढला.