लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सन २०२१-२२ सालच्या ४३८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काही अटी-शर्तींसह मंजुरी दिली, अशी माहिती उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.
येथील नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या २८ जानेवारीला झालेल्या बैठकीत ४३८ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर २६ फेब्रुवारीला नगरपालिकेच्या विशेष सभेमध्येही बहुमताने हे अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आले. त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळावी, यासाठी ३० एप्रिलला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. २० दिवसांतच जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे.
मंजूर अर्थसंकल्पात विविध कर्जांची मुद्दल व व्याजाचे हप्ते फेडणे. दुर्बल घटक-महिला व बालकल्याण समिती-दिव्यांग घटक, तृतीयपंथीयांसाठीची तरतूद, आदी सर्व कामे मार्गी लागणार आहेत. शासनाकडून अनुदानापोटी १२८ कोटी रुपये येणेबाकी आहे. त्यासाठी खासदार, आमदार व पालकमंत्री यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, तो निधी प्राप्त झाल्यास विकासाला आणखीन गती मिळेल, असा विश्वासही पोवार यांनी व्यक्त केला. बैठकीस मुख्य लेखापाल कलावती मिसाळ, दिलीप हराळे, चंद्रकांत लोखंडे, आदी उपस्थित होते.