कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर नाग का घडविण्यात आला नाही, याबाबत केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. त्यांचा अहवाल आणि देवस्थान सदस्य व श्रीपूजकांशी चर्चा केल्यानंतर मूर्तीवर नागमुद्रा घडविण्यावर निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी स्पष्ट केले. पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी २२ जुलै ते ६ आॅगस्ट केलेल्या अंबाबाई मूर्ती संवर्धनादरम्यान मूर्तीच्या डोक्यावर नागमुद्रा घडवायची राहून गेली आहे. त्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप बदलले असून कोल्हापूरकरांच्या धार्मिक भावना दुखाविल्या आहेत. याशिवाय विविध संघटनांनी मूर्तीवर पुन्हा नागमुद्रा घडविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, मूर्ती संवर्धनापूर्वी झालेल्या बैठकीत संवर्धनादरम्यान मूर्तीचे काही नुकसान झाल्यास त्याला केंद्रीय पुरातत्त्व खात्यास जबाबदार राहील, असे जाहीर करण्यात आले होते. संवर्धनाचे काम सुरू होताना मूर्तीवर नाग होता का? आणि असला तर तो का घडविण्यात आला नाही? याची उत्तरे पुरातत्त्व खात्याचे अधिकारीच देऊ शकतात. मूर्ती संवर्धनाचा निर्णय देवस्थान समिती आणि श्रीपूजक मंडळाने मिळून घेतल्याने मी एकटा त्यावर निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे देवस्थान समितीकडेही याबाबतचा अभिप्राय मागविण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला केंद्रीय पुरातत्त्वचा अहवाल
By admin | Published: August 13, 2015 12:54 AM