कोल्हापूर :जिल्हाधिकाऱ्यांनी पूर व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनासोबत कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांतील स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक करत कठीण प्रसंगी मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे काम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या हस्ते आपदा सखी शुभांगी घराळ हिचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यात चांगला पाऊस होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असलेल्या गावांना मदत पोहोचवण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मंगळवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी जिल्हा प्रशासनाच्यवतीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली.