कोल्हापूर : दिल्लीत आत्महत्याग्रस्त माजी सैनिकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला गेलेले कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बुधवारी (दि. २) पोलिसांनी अटक केल्याचे पडसाद गुरुवारी कोल्हापुरात उमटले. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन, छत्रपती शिवाजी चौकात तासभर निदर्शने करून ‘रास्ता रोको’ केला. यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत निषेध करण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकवटले. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘नरेंद्र मोदींचा धिक्कार असो....,’ ‘भाजप सरकारचा धिक्कार असो...’, ‘देवेंद्र-नरेंद्र, हाय हाय...’, ‘हुकुमशहा सरकारचा धिक्कार असो..., मोदी सरकार हाय हाय...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी तब्बल तासभर निदर्शने करून ठिय्या मारला. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. पोलिसांनी हस्तक्षेप करून, आंदोलकांना वाहतूक खुली करायला सांगून, पूर्ववत जागेवर आंदोलन करण्याची सूचना केली. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा आंदोलनस्थळी येऊन घोषणाबाजी सुरू केली व काही वेळातच या आंदोलनाची सांगता झाली. यावेळी पी. एन. पाटील म्हणाले, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेल्या ‘वन रॅँक, वन पेन्शन’ची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. २) एका माजी सैनिकाने आत्महत्या केली. त्यांच्या घरी कुटुंबीयांचे सांत्वन करायला गेलेले राहुल गांधी यांना अटक करून मोदी सरकारने हुकुमशाही प्रवृत्ती दाखवून दिली आहे. तिचा आम्ही निषेध करीत आहोत. कॉँग्रेसने ५० वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य केले. त्यांतील ४० वर्षे पंतप्रधानपद हे गांधी घराण्याकडे होते. त्यांनी कधीही असा प्रकार केला नाही; परंतु मोदी यांच्या रूपाने देशात हिटलरशाही निर्माण होत असल्याचे दिसत आहे. आमदार सतेज पाटील म्हणाले, माजी सैनिकाच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला गेलेल्या राहुल गांधी यांना अटक करून भाजप सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. अशा प्रकारे कायदा धाब्यावर बसविणे हे लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. हे सरकार जर विरोधकांचा आवाज जर अशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करीत असेल तर सर्वसामान्यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. आंदोलनात महापौर अश्विनी रामाणे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रकाश सातपुते, तौफिक मुल्लाणी, गणी आजरेकर, महिला जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर, शहराध्यक्षा संध्या घोटणे, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, सदस्य हिंदुराव चौगुले, महापालिका परिवहन सभापती लाला भोसले, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, सभागृह नेता प्रवीण केसरकर, नगरसेविका दीपा मगदूम, नगरसेवक भूपाल शेटे, एस. के. माळी, संजय पाटील, लीला धुमाळ, रूपाली पाटील, वैशाली महाडिक, मालती ढाले, विद्या काळे, दिलीप पोवार, बबन रानगे, रणजित पोवार, अमर देसाई, मोहन पोवार, बाबूराव कांबळे, सचिन चौगुले, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) हिटलरशाही निर्माण होत असल्याचा आरोप ‘नरेंद्र मोदींचा धिक्कार असो....,’ ‘भाजप सरकारचा धिक्कार असो...’, ‘देवेंद्र-नरेंद्र, हाय हाय...’, ‘हुकूमशहा सरकारचा धिक्कार असो..., मोदी सरकार हाय हाय...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोदी यांच्या रूपाने देशात हिटलरशाही निर्माण होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी तब्बल तासभर निदर्शने करून ठिय्या मारला. यानंतर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. पोलिसांनी हस्तक्षेप करून, आंदोलकांना वाहतूक खुली करायला सांगितली.
जिल्हा काँग्रेस रस्त्यावर
By admin | Published: November 04, 2016 12:59 AM