कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांना महिनाभराच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. शासनाच्या यादीबाहेरील औषधे जादा दराने घेतल्याचा ठपका ठेवत सध्या या प्रकरणी अहवाल तयार करण्यात आला असून आता या अहवालावर पुढील कार्यवाही करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.आरोग्य विभागाने गेल्या वर्षभरामध्ये ३ कोटी रुपयांची औषध खरेदी केली आहे. यामध्ये शासनाच्या यादीवरील ५६० औषधांव्यतिरिक्त अन्य कंपन्यांचीही काही औषधे खरेदी करण्यात आली आहे.
एकीकडे शासनमान्य यादीबाहेरील औषधे खरेदी करणाऱ्या आरोग्य विभागाने दुसरीकडे शासन कराराच्या काहीच याद्याच विचारात घेतल्या आहेत. अन्य याद्या विचारार्थ घेऊन जर औषध खरेदी केली असती तर जिल्हा परिषदेचे १६ लाख रुपये वाचले असते, असे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते.जानेवारीच्या अखेरीस याबाबत चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, वृत्तपत्रांनी आवाज उठविल्यानंतर पुन्हा तातडीने याबाबत कार्यवाही सुरू झाली. चौकशीचे कामही सखोलपणे झाले नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चौकशी अहवाल वित्त विभागाकडे सोपवून त्याची छाननी करण्याच्या सूचना केल्या.त्यानुसार दोन दिवसांत छाननी करून हा अहवाल सोमवारी रात्री डॉ. खेमनार यांच्याकडे देण्यात आला. यामध्ये प्रशासकीय आणि वित्तीय अशा दोन प्रकारांतील प्रक्रिया त्रुटी दाखविण्यात आल्या असून वित्तीय अनियमितता असल्याचे स्षष्ट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रशासन विभागाने सोमवारी दोन वरिष्ठांना या अहवालाची छाननी करण्याचे काम दिले असून त्यानुसार आता चौकशीच्या नोटिसा दोन दिवसांत काढल्या जातील.
सर्वसाधारण सभेतील उद्रेक टाळण्याचा प्रयत्नडॉ. प्रकाश पाटील यांची कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या विभागाबाबत अनेक तक्रारी होत्या. याबाबत त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी समजही दिली होती. मात्र, त्यांनी कोणत्याही सुधारणा केल्या नाहीत. या प्रकरणानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार यांनी त्यांना कडक भाषेत सूचना केल्या. त्यानंतर मग डॉ. पाटील यांनी महिन्याची रजा टाकली. येत्या ९ मार्चला सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामध्ये फार उद्रेक होऊ नयेत असे प्रयत्न सुरू आहेत.