दीपक जाधवकोल्हापूर : जिल्ह्यासाठी शंभर खाटांच्या महिला व तेवढ्याच खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळून दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही जागेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. या दोन रुग्णालयांसाठी मध्यवर्ती जागा मिळत नसल्याने मंजुरी मिळून या रुग्णालयाची उभारणी होऊ शकली नाही.कोल्हापूर जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्णांसाठी असणारे ‘सीपीआर’ हे जिल्हा रुग्णालय छत्रपती राजर्षी शाहू महाविद्यालयाकडे वर्ष २००० मध्ये चल-अचल साधनसामग्रीसह हस्तांतरित केले. तेव्हापासून कोल्हापुरातील जिल्हा रुग्णालयाचे अस्तित्व संपले. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने दहा वर्षांपूर्वी शासनाच्या बृहत आराखड्यानुसार कोल्हापूरसाठी १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय व १०० खाटांचे महिला रुग्णालय मंजूर केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ३० किलोमीटरच्या परिसरात ग्रामीण भागात एक रुग्णालय हवे असा नियम आहे. त्याचा आधार घेऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मतदारसंघात एक रुग्णालय मंजूर केले आहे.कोल्हापूरची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३८ लाख ७६ हजार इतकी होती. ही लोकसंख्या २०२४ पर्यंत साधारण ४२ लाख ८५००० पर्यंत वाढ झाली असून, या इतक्या लोकसंख्येमागे सद्य:स्थितीत एकही जिल्हा रुग्णालय नाही. या रुग्णालयास आवश्यक असणारी प्रत्येकी २ एकर जागा कोल्हापुरात मिळत नाही. महिलाच्या निरोगी आरोग्यावर तासनतास भाषण ठोकणारे नेतेमंडळी या महिला रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला जागा देण्यासाठी लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे. कोल्हापूर शहराच्या आमदार या महिला असतानासुद्धा जागेअभावी जिल्ह्यात महिला रुग्णालय उभे राहू शकत नाही, हे दुर्दैव आहे.
गरज कशासाठी..?कोल्हापूर हे शेजारच्या जिल्ह्यांच्या तुलनेत चांगल्या सार्वजनिक आरोग्य सेवा देणारे प्रमुख केंद्र आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातून आणि सीमाभागातून अनेक रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे या रुग्णालयांची गरज प्रकर्षाने आहे.
शासनाकडून मंजूर झालेल्या महिला रुग्णालयासाठी एक जागा बघितली असून त्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे. -डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर.