म्हासुर्ली : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील गट क्रमांक ३४ मधील दोन गुंठे खरेदी पत्र असताना २१ गुंठे चा फेरफार व डायरी नोंद केल्याप्रकरणी म्हासुर्लीचे तलाठी विजय पाटील आणि राशिवडे मंडळ अधिकारी देविदास तरडे यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोषी असल्याचा ठपका ठेवत अनिश्चित काळासाठी निलंबित केले. या प्रकारामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हासुर्ली येथील गट क्रमांक ३४ मधील दोन गुंठेजमीन जमीन मालकाने बांधाशेजारी बांध असणाऱ्या शेतकऱ्यास खरेदी पत्रान्वये विक्री केली. गट क्रमांक ३४ ची ऑनलाइन डायरी येताना त्यामध्ये अन्य गावातील चार चुकीच्या डायऱ्या आल्याने ही नोंदणी रद्द करून पुन्हा नव्याने डायरी करण्यात आली. मात्र तलाठी विजय पाटील यांनी नजरचुकीने दोन गुंठे ऐवजी २१ गुंठे क्षेत्र खरेदी घेणाऱ्याच्या नावावर केले. हे लक्षात येताच दोष दुरुस्तीचा प्रस्ताव तहसीलदार ऑफिसला सादर केला. दरम्यानच्या काळात म्हासुर्ली येथूनच प्रांताधिकारी कार्यालयाकडे या प्रकाराची तक्रार झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली. या प्रकाराची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गंभीर दखल घेत तुकडेबंदी कायद्याचा भंग आणि बेकायदेशीर काम केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. हा प्रकार नजरचुकीने तलाठी पाटील निलंबित झाल्याचे तसेच मंडलाधिकारी तरडे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे समजताच गट क्रमांक ३४ मधील खरेदी देणार आणि घेणार या दोघांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. हा प्रकार तलाठ्याकडून नजरचुकीने झाला असून आमचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे कोणावरही निलंबनाची कारवाई करू नये अशी विनंती एका निवेदनाद्वारे केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याप्रमाणे सर्व व्यवस्थित होईल असे उत्तर दिले.
म्हासुर्लीचे तलाठी आणि राशिवडेचे मंडलाधिकारी निलंबित, जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 5:43 PM