कोल्हापूर : संपूर्ण राज्याचा पारा वाढला असून कोल्हापूर जिल्ह्याचे तापमान ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे किमान तापमान २४ डिग्रीपर्यंत आल्याने उष्मा वाढला आहे. दिवसभर अंगाची लाही लाही होत होती.मागील आठ-दहा दिवसांत जिल्ह्यात रोज वळीव पाऊस हजेरी लावत होता. त्यामुळे तापमान काहीसे कमी झाले होते, परिणामी वातावरणात उष्माही कमी झाला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून उष्मा वाढत गेला. संपूर्ण राज्यातील तापमानही वाढत आहे.
कोल्हापुरात गेल्या आठवडाभरात कमाल तापमान सरासरी ३७ डिग्री राहिले. कमाल तापमानात वाढ होत असताना किमान तापमानही वाढले आहे. किमान तापमान सरासरी २४ डिग्रीपर्यंत आल्याने उष्मा वाढला आहे.
सकाळी आठ वाजल्यापासूनच अंग तापण्यास सुरुवात होते. दहा वाजता घराबाहेर पडले की, अंगाकडून घामाच्या धारा वाहू लागतात. दुपारी एकनंतर तर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. दिवसभर उष्मा जाणवतोच. रात्रीही उष्म्याने जीव कासावीस होतो.मशागतीच्या कामावर परिणाम!सध्या खरीप पेरणीसाठी शिवारात धांदल उडाली आहे. मशागतीसह भाताची धूळवाफ पेरणीसाठी बळीराजा सकाळी लवकरच घराबाहेर पडत आहे. उन्हाच्या तडाक्यामुळे दुपारी शेतीची कामे होत नाहीत.रविवारी वळवाची हजेरीगेली आठ दिवस वळीव पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. येत्या तीन दिवसांत जिल्ह्याचे तापमान वाढत असल्याने पावसाची शक्यता कमी आहे. शनिवारी मात्र ढगाळ वातावरण होईल आणि रविवारपासून पुढील तीन दिवस वळीव हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.असे राहील आगामी चार दिवसांतील तापमान डिग्रीमध्ये-
वार किमान कमाल
- बुधवार २४ ३९
- गुरुवार २४ ३८
- शुक्रवार २४ ३८
- शनिवार २५ ३८ (ढगाळ वातावरण)
- रविवार २५ ३७ (पावसाची शक्यता)