कोल्हापूर : वाढलेल्या किरकोळ खर्चावरून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मोठा वाद झाला. विरोधकांच्या आक्षेपांना सत्ताधाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने दोन्ही बाजूंकडून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. सभेची सुरुवात किरकोळ खर्चावरून वादानेच झाली आणि मुख्यालय इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्राच्या वादानेच सभेचा शेवटही झाला. बांबवडे शाखेचा खर्च अहवालात लपविल्याच्या विरोधकांच्या आक्षेपावरही सत्ताधाऱ्यांनी ‘मंजूर-मंजूर’चा गजर करीत सभा तासाभरातच गुंडाळली. सत्ताधाºयांच्या या प्रवृत्तीला विरोधी सदस्यांनी जोरदार हरकत घेतली.
कोल्हापूरजिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची ५३वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी साईक्स एक्स्टेंशन, शाहूपुरी येथील संस्थेच्याच महालक्ष्मी सभागृहात झाली. व्हाईस चेअरमन शांताराम माने यांनी चेअरमनपदाची प्रभारी सूत्रे हातात घेऊन सभा चालविली. माजी चेअरमन एम. आर. पाटील व महावीर सोळांकुरे यांच्या नेतृत्वाखाली सभेच्या कामकाजास सुरुवात केली. व्यवस्थापक विजय बोरगे यांनी अहवालाचे वाचन केल्यानंतर सभेची सर्व सूत्रे प्रभारी चेअरमन म्हणून माने यांनी हातात घेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.विरोधकांची ताकद एकवटू नये याची तजवीज सभेआधीच सत्ताधाºयांकडून केली गेली असली तरीदेखील सचिन जाधव, वीरेंद्र काळे, मानसिंग वास्कर, शरद देसाई या विरोधी सदस्यांनी सत्ताधाºयांना सुरुवातीपासूनच कोंडीत पकडले. अहवालात किरकोळ खर्च एक लाख ९७ हजार दाखविला आहे. मूळ हेडवर खर्च असताना पुन्हा एवढा खर्च कशासाठी, असा सवाल केला.
यावर चेअरमन माने यांनी ‘तुमच्याच कार्यकाळात २००७ मध्ये दोन लाखांवर किरकोळ खर्च झाला होता,’ असे बजावले. याला ‘जुने काढू नका, आताचे बोला,’ असे म्हणून जाधव यांनी जोरदार हरकत घेतली. २००७ ला या खर्चावरूनच मोठा भ्रष्टाचार झाला होता. तत्कालीन सत्ताधाºयांना पायउतार व्हावे लागले होते, याची आठवण करून दिली. सर्वच विरोधी सदस्यांनी किरकोळ खर्चावरून जोरजोरात जाब विचारण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. माने, सोळांकुरे, कृष्णात किरूळकर, एम. आर. पाटील यांनीही व्यासपीठावरून जोरदार हातवारे सुरू केल्याने वादात आणखी भर पडली. त्यानंतरही मुख्यालयाच्या इमारतीतील भाडे आणि भोगवटा प्रमाणपत्रावरून विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यालाही सोळांकुरे यांनी पाच वर्षांपासून आमचा पाठपुरावा सुरू आहे, असे उत्तर दिले.
बांबवडे शाखा खर्चावर आक्षेपबांबवडे शाखेत १२ लाखांचा खर्च झाला आहे; पण अहवालात मागणी व खर्च अशा कोणत्याच प्रकारात तो दाखविण्यात आलेला नाही. खर्चाची लपवालपवी का असा प्रश्न वीरेंद्र काळे यांनी विचारला. याला चेअरमन माने यांनी इमारत निधी खर्चातच ते धरले असल्याने स्वतंत्र धरण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगितले.
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली.