घन:शाम कुंभार -यड्राव -कोणत्याही उत्पादनाची अथवा गोष्टीची प्रसिद्धी केल्याशिवाय त्याची गुणवत्ता समाजातील सर्व थरांपर्यंत जात नाही, हे स्पर्धेच्या युगात सिद्ध झाले आहे. यामुळेच खासगी शिक्षण संस्थांच्या वाढत्या संख्येच्या स्पर्धेत जि. प.चा प्राथमिक शिक्षण विभागही मागे नाही, हे दर्शविण्यासाठी जि. प.कडून पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील बारा केंद्रीय शाळांची गुणवैशिष्ट्ये व गुणवत्ता दर्शविणारा संगीतमय ‘शिक्षणरथ’ आपआपल्या केंद्रांतर्गत गावात शिक्षण प्रसारासाठी धावण्यास सुरू झाला आहे. यामुळे जि. प.च्या प्राथमिक शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल, अशी आशा आहे.तालुक्यामध्ये बऱ्याच शाळा मुख्याध्यापकांच्या अभिनव उपक्रमामुळे गुणवत्तेसह विविध कला, क्रीडा क्षेत्रांत विद्यार्थ्यांना अग्रेसर बनवीत आहेत, परंतु अशा शाळांची संख्या थोडी आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षणाबरोबर खेळ, विज्ञान, संगीत, कला, कवायत, दांडपट्टा, तिरंदाजी, विज्ञान प्रदर्शन या ज्ञानाबरोबर एबी अध्ययन पद्धत, सेमी इंग्रजी माध्यम, ई-लर्निंग सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा, परिसर भेटी, बाल साहित्य संमेलन, असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या शिक्षण रथामुळे शासनाच्यावतीने प्राथमिक शिक्षणासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती होऊन खासगी शिक्षण संस्थांप्रमाणेच गावातील शाळांमध्ये शिक्षण सुविधा व विविध कला, क्रीडा प्रकारांच्या शिक्षणाची संधी मिळणार असेल, तर जिल्हा परिषदेची शाळाच आपल्या मुलांसाठी बरी, अशीच मानसिकता निर्माण होईल. तालुक्यातील बारा कें्रदीय शाळा अंतर्गत त्या-त्या केंद्रीय शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती एका वाहनावर डिजिटल फलकाद्वारे लावून संगीतमय प्रबोधनातून स्पिकरच्या माध्यमातून संबंधित गावामध्ये घोषविण्यात येत आहे. यामुळे जिल्हा परषिदेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती होणार आहे.
जि. प. शिक्षण प्रसारासाठी ‘शिक्षणरथ’ धावला
By admin | Published: June 13, 2015 12:39 AM