कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीची सभा झालेली नाही. कोरोनाच्या काळामध्ये एकत्र येण्यासच मज्जाव असल्यामुळे ही सभा घेता आलेली नाही. मात्र, याच काळात कोरोनाविरोधातील लढाईसाठी जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या प्रमाणावर निधी अदा करावा लागला आहे. याला कार्योत्तर मंजुरी या सभेत घेतली जाईल.
याआधी २४ जानेवारी २०२० रोजी ही सभा झाली होती. या सभेचे इतिवृत्त वाचून कार्यपूर्ती अहवालाला मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना मार्च २०२० अखेरच्या खर्चास मान्यता देणे, दोन वर्षांतील निधीतून कोरोनासाठी जो खर्च झाला त्या कामांना आणि पुनर्विनियोजनाला मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२०/२१ आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योाजना सन २०२१/२२ च्या आराखड्यास मान्यता घेणे असे या सभेसमोर विषय आहेत. पालकमंत्री पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यासह तीनही खासदार व सर्व आमदार या सभेला उपस्थित राहणार आहेत.