कोल्हापूर : विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या महिन्यात दुसऱ्यांदा महसूल कर्मचारी, तर तलाठी यांनी पहिल्यांदाच बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील महसूल प्रशासन दुसऱ्यांदा ठप्प झाले. सर्व महसूल कार्यालयांत अधिकारी कामावर, कर्मचारी आंदोलनात असे चित्र राहिले. यामुळे कामानिमित्त आलेल्या लोकांची गैरसोय झाली. तलाठी सजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना करावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा तलाठी संघातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून विविध माध्यमांतून आंदोलन केले जात आहे. १२ एप्रिल रोजी लेखणी बंद आंदोलन त्यांनी केले होते. आंदोलनाचा पाचवा टप्पा म्हणून तलाठी वगळता सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सुरू असलेल्या तलाठी यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. यामुळे सर्वच महसूल कामकाज बंद झाले. कार्यालये ओस पडली होती. अनेक कार्यालयांचे दार बंद करण्यात आले होते. यामुळे कामकाजावर परिणाम झाला. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यामहसूल कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या अशा : जुनी पेन्शन योजना लागू करावी, लिपिक पद रद्द करून ‘महसूल सहायक पद’ निर्माण करावे, निवडणुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, महसूल विभागाच्या नवीन योजना अंमलबजावणीसाठी स्वंतत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तालुक्यासाठी खनिकर्म निरीक्षकांची पदे निर्मित करावीत.तलाठ्याच्या मागण्या :सात-बारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर कराव्यात, हायस्पीड इंटरनेट सुविधा द्यावी, तलाठ्यांना सात-बारा, आठ अ देण्यासाठी प्रिंटर द्यावा, तलाठी कार्यालय सुसज्ज करावीत, पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अवैध गौणखनिज वसुलीतून तलाठ्यांना वगळावे, अंशदायी निवृत्तिवेतन योजना सुरू करावी, पदोन्नतीमध्ये द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा, सरळ सेवेतील २५ टक्के कर्मचारी खात्यांतर्गत राखीव ठेवाव्यात. तलाठी २६ पासून बेमुदत संपावर..तलाठी आज, गुरुवारपासून संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार घालणार आहेत. २६ एप्रिलपासून तलाठी, मंडल अधिकारी बेमुदत संपावर जाणार आहेत. सकारात्मक चर्चा न झाल्यास १ मे रोजी मुंबई येथे मंत्रालयासमोर उपोषण करणार आहेत. ४महसूलच्या वाहनावर चालक नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वाहनातून कार्यालयात आले.
जिल्ह्यात महसूल प्रशासन ठप्प
By admin | Published: April 21, 2016 12:35 AM