कोल्हापूर : लोकसभा निवडणुका शांततेत पार पडल्या म्हणून थाटात राहू नका, मतमोजणी तोंडावर आली आहे. निकालानंतर जल्लोषी आणि धीरगंभीर वातावरणात कुठेही ठिणगी पडून भडका उडू शकतो. आपल्या हद्दीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही; यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने सतर्क राहावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या.जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा बुधवारी पोलीस मुख्यालयात घेण्यात आला. यावेळी डॉ. देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या बंदोबस्तावर चर्चा केली. निवडणूक शांततेत पार पडली म्हणून थाटात राहू नका, बंदोबस्ताचा खरा कस मतमोजणीदिवशी आहे. निकालादिवशी जिल्ह्यात तणावसदृश परिस्थिती असणार आहे.
विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते जल्लोषात, तर पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते धीरगंभीर असणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही क्षणी राडा होऊ शकतो; त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार बंदोबस्ताचे नियोजन आतापासूनच करा. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही; यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी केल्या.खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, ठकबाजी, फसवणूक, गर्दी-मारामारी, बनावट नाणी, अपहरण, आत्महत्येचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दुखापत, प्राणघातक अपघात, जुगार-मटका, आदी वेगवेगळे गुन्हे नेहमी प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. अशा प्रकारच्या प्रलंबित गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करा. जबरी चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, लूटमारीसारखे गुन्हे पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेऊन पोलीस ठाण्याचे आॅनलाईन रेकॉर्ड अपडेट ठेवा. रेकॉर्डवरील फरार गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर नियोजन करा.
विशेष पथके स्थापन करून मोक्का आरोपींचा शोध घ्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यापूर्वी भक्कम पुरावे गोळा करून ते सादर करा. दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी तपासामध्ये पारदर्शकता ठेवा. जिल्ह्यात कुठे अवैध धंदे सुरू असतील, तर त्यांचा बीमोड करा, आदी सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, करवीरचे डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूवाडीचे आर. आर. पाटील, इचलकरंजीचे गणेश बिरादर, जयसिंगपूरचे किशोर काळे, गडहिंग्लजचे अनिल कदम, आदींसह निरीक्षक, सहायक निरीक्षक उपस्थित होते.अधिकाऱ्यांचा गौरवसर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमचा समावेश आहे.पुरस्कारप्राप्त अधिकारी व पोलीस ठाणेबेस्ट डिटेक्शन : कळे बँक दरोडा, व करवीर खून प्रकरण स्थानिक गुन्हे शाखा, कळे पोलीस ठाणे, करवीर पोलीस ठाणे. प्रत्येकी १0 हजार रुपयेबहिर्जी नाईक पुरस्कार : अमोल कोळेकर, सचिन पाटील (कोल्हापूर क्राईम ब्रँच), वैभव दड्डीकर (इचलकरंजी क्राईम ब्रँच) प्रत्येकी १0 हजार रुपयेबेस्ट पोलीस ठाणे आॅफ द मंथ : शिरोळ पोलीस ठाणे, १0 हजार रुपयेमोक्क्यातील गुन्ह्यातील फरार आरोपींना शिताफीने अटक केल्याप्रकरणी प्रत्येकी २५ हजार रुपये विशेष पारितोषिक : स्थानिक गुन्हे शाखा