कोल्हापूर : जिल्ह्यात ब्रेक द चेनअंतर्गत शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी पूर्णत: बंद राहतील. यासह पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी त्या-त्या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, राज्य शासनाने पाच टप्प्यात अनलॉक जाहीर केला आहे. त्यात कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊन लागू असणार आहे. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील.
यात सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदाने, सलून, पार्लर अशी दुकाने पूर्णत: बंद राहतील. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त केली जाणार आहेत. विनामास्कविरुद्ध पोलीस तीव्र कारवाई करतील.