कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक ‘ब’ गट क्रिकेट स्पर्धेत चौदा वर्षांखालील कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघाने शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघावर मात करीत खळबळ माजविली.
राजाराम काॅलेज मैदानावर सोमवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाने ४० षटकांत ८ बाद २०९ धावा केल्या. यात विश्वनाथ वरुटे याने ६०, सागर पोवारने ३४, अभिजित कोठावळे २४, युवराज साबळे १० धावा केल्या. चौदा वर्षांखालील जिल्हा संघाकडून प्रेम मगदूमने तीन, वरद खोडवे व दर्शन निंबाळकरने प्रत्येकी दोन, रोहित गिरीने एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना जिल्हा संघाने ३७.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात २१३ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. यात अथर्व शेळकेने नाबाद ६५, एकलव्य खाडेने ५८, दर्शन निंबाळकरने नाबाद ४३ व पार्थ गणबावलेने नाबाद ३० धावा केल्या. विद्यापीठ संघाकडून विनायक शिंदेने दोन, तर सागर पवारने एक बळी घेतला.