सांगली : उष्म्याने हैराण झालेल्या जिल्ह्याला बुधवारी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यातील येळापूर, मेणीसह गुढे-पाचगणी परिसरात पावसाने गारांसह हजेरी लावली. तासगाव शहरासह सावळज परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आष्टा येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला. संपूर्ण जिल्हा वाढत्या उष्म्यामुळे हैराण झाला आहे. शनिवारी पूर्वभागात वळीव पाऊस आणि गारपीट झाल्याने गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर गेले दोन दिवस पुन्हा उकाडा वाढला होता. बुधवारी सकाळपासूनच बहुतांश तालुक्यांत ढगाळ वातावरण होते. तापमान वाढल्याने पावसाची चाहूल लागली होती. दुपारच्या सुमारास शिराळा तालुक्यातील येळापूर, मेणीसह गुढे-पाचगणी परिसरात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने गारांसह हजेरी लावली. एक तास मुसळधार पाऊस पडल्याने नाले, गटारींसह ओढे भरून वाहत होते. सायंकाळी कुसळेवाडी, पणुंब्रे वारूण, किनरेवाडी, येळापूर परिसरातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शिराळा शहरासह शेंडगेवाडी, खुजगाव, कोकरुड परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.इस्लामपूर शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तुरळक सरी कोसळल्या. दहा मिनिटांच्या कालावधीसाठी वळवाच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर वातावरणात आणखी उष्मा वाढला. आष्टा व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे पडली, तर सखल भागात पाणी साटले होते. मर्दवाडी, मिरजवाडी, कारंदवाडी, फाळकेवाडी, नागाव, पोखर्णी येथे जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. पलूसमध्ये सायंकाळी जोराच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. तासगाव शहरासह पूर्व भागात दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. वादळी वाऱ्यामुळे सावळज परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सावळजसह परिसरात पावसापेक्षा वादळी वाऱ्याचा तडाखा जोरदार होता. या वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडांची, काही ठिकाणी घरांची मोडतोड झाली. रस्त्यालगतची झाडे मोडून पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सावळज, डोंगरसोनी, बस्तवडे, आरवडे, मांजर्डे, वायफळे, खुजगाव, चिंचणी, सावर्डे, वाघापूरसह परिसरात पाऊस झाला.ऐतवडे बुद्रुक येथे घरांवरील पत्रे उडून नुकसानवाळवा तालुक्यातील चिकुर्डे, कार्वे, ऐतवडे बुद्रुक, करंजवडे, ढगेवाडी, देवर्डे, जक्राईवाडी, ठाणापुडे परिसरात जोरदार पाऊस झाला. लाडेगाव-शिराळा रस्त्यावर ऐतवडे बुद्रुक येथे झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ऐतवडे बुद्रुक येथील शंकर दादा गिड्डे, संदीप पाटील, शंकर शिंदे यांच्या घरावरील पत्रे उडून शेजारील घरांवर पडले. परिसरातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. कुरळप, वशी, ऐतवडे खुर्द भागातही विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.आष्ट्यात विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यूआष्टा येथील माणिक दत्तात्रय बावडेकर (वय ४३, रा. बसुगडे मळा) या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेचार वाजता घडली. बसुगडे मळा येथील बावडेकर शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते. यावेळी जोरदार वारा व पाऊस झाला. त्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या. हत्तीगवत कापत असताना, खाली पडलेल्या विजेच्या तारेला बावडेकर यांचा हात लागला. तारेतून वीजप्रवाह चालू असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दहा लाखांचे नुकसानवळीव पावसामुळे शिराळा तालुक्यातील कुंभवडेवाडी व सावंतवाडी येथे नऊ घरांचे छत उडून गेल्याने दहा लाखांचे नुकसान झाले. कऱ्हाड-शेंडगेवाडी व शेंडगेवाडी ते गुढे पाचगणी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या पडल्या. तसेच आंब्याचे मोठे नुकसान झाले. कुंभवडेवाडी येथील प्रकाश कुंभवडे, सुरेश कुंभवडे, सुनीता जगताप यांच्या घरावरील छत उडून गेल्याने त्यांचे पाच लाखांचे नुकसान झाले. सावंतवाडी येथील मंदा सुरेश बेंगडे यांच्या घरावरील पत्र्याचे छत शेजारील आनंदा रामचंद्र शेळके, विकास पांडुरंग शेळके, प्रकाश बबन शेळके, बाबूराव शामराव बेंगडे, राजाराम गोविंद बेंगडे या सर्वांच्या घरांवर जाऊन पडल्याने त्यांच्याही घरांची कौले फुटली व आढे मोडून पडली आहेत.१पळशीत वीज कोसळून १९ शेळ्या ठारखानापूर : पळशी (ता. खानापूर) येथे बुधवारी वीज कोसळून डोंगरपायथ्याशी चरायला गेलेल्या १९ शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शिर्केचे पठार भागात घडली. यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.२ पळशी येथील रंगराव केरू ऐवळे व तुळसाबाई मारुती जाधव शेळ्या घेऊन गावाच्या पूर्वेस असलेल्या शिर्केचे पठार (पुळदुर्ग) परिसरात गेले होते. पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट झाला. त्यावेळी भयभीत झालेल्या शेळ्या पळसाच्या झाडाखाली जाऊन थांबल्या, तर रंगराव ऐवळे व तुळसाबाई जाधव दुसऱ्या झाडाखाली जाऊन थांबले होते. शेळ्या थांबलेल्या पळसाच्या झाडाजवळ वीज कोसळली. त्यामुळे झाडाखाली थांबलेल्या १९ शेळ्या जागीच ठार झाल्याने सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. ३ या घटनेची माहिती गावातील लोकांना समजताच त्यांनी शिर्केचा पठार येथे घटनास्थळी गर्दी केली. सुदैवाने ऐवळे व जाधव बचावले. दोघांचीही घरची परिस्थिती हलाखीची आहे. वीज कोसळून १९ शेळ्या दगावल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे.
जिल्ह्याला वळवाने झोडपले
By admin | Published: May 04, 2017 12:15 AM