भीमगोंडा देसाई --कोल्हापूर --जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील वैयक्तिक लाभाच्या साहित्य खरेदीतील ढपला प्रवृत्ती थांबविण्यासाठी लाभार्थ्याच्या खात्यावर थेट पैसे जमा करावेत, अशी मागणी होत आहे. मात्र साहित्यखरेदीत ‘हात मारण्याची’ चटक लागलेले त्याला विरोध करण्यात आघाडीवर आहेत, असा आरोप होत आहे. खात्यावर जमा केलेल्या पैशांचा व्यसनासाठी उपयोग केला जाईल, दुरुपयोग होईल असे सांगत लाभार्थ्यांवर अविश्वास दाखविला जात आहे.प्रत्येक वर्षी मुले, मुलींसाठी सायकल, शिलाई यंत्र, बचत गटांना भांडी संच, पिको व झेरॉक्स यंत्र असे साहित्य लाभार्थ्यांना दिले जाते. लाभ देताना तो पात्र लोकांना द्यावा. सदस्यांची शिफारस घेण्याची गरज नाही, असा शासनाचा नियम आहे; परंतु, अपवाद वगळता बहुतांश सदस्य आपल्या बगलबच्च्यांना लाभ मिळावा म्हणून शासनाचे नियम धाब्यावर बसवून शिफारसपत्र देऊनच लाभार्थी निवड करतात. त्यामुळे शिफारस न घेता वैयक्तिक लाभ द्यावा, अशी अंकुश संघटनेची मागणी आहे. समाजकल्याण, महिला बालकल्याण, कृषी विभागातर्फे यंदा सुमारे २० कोटींपर्यंत साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. साहित्य खरेदी करताना आॅनलाईन निविदा मागविण्यात येते. परंतु, ढपलाबहाद्दर बाहेर तडजोड केलेल्या कंपनीलाच ठेका मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध कट रचतात. प्रसंगी दादागिरीची भाषा वापरतात त्यामुळे गेल्या सर्वसाधारण सभेत संबंधित निविदाच रद्द केल्या. साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करणे असे प्रकार निदर्शनास आले. त्यामुळे शासनाने नव्या निर्णयामध्ये थेट खात्यावर पैसे जमा करण्याची मुभा ठेवली आहे.चोरवाटा बंद होतीललाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा केल्यानंतर साहित्य खरेदी केली जाणार नाही, पैशांचा दुरुपयोग होईल, असे विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गरज नसलेले लाभार्थी मिळालेल्या साहित्याची विक्री करून पैसे घेतात. यामुळे खात्यावर पैसे जमा केल्यानंतर साहित्य खरेदी दरम्यानच्या चोरवाटा तरी बंद होतील, असे अभ्यासू सदस्यांचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेचा लाभार्थ्यांवर अविश्वास
By admin | Published: March 14, 2016 12:37 AM