: निपाणीत फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन
निपाणी : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर या महापुरुषांनी आपल्या कार्यकाळात अखेरपर्यंत जातीभेद संपविण्यासाठी कार्य केले; पण आजच्या पिढीने या महापुरुषांचा खराखुरा इतिहास न समजून न घेतल्याने महापुरुषच जाती-जातीत वाटून घेण्यात आले आहेत, अशी खंत प्रा. यशवंत गोसावी यांनी व्यक्त केली.
डॉ. आंबेडकर विचार मंच यांच्यावतीने येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात फुले-शाहू-आंबेडकर विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रा. गोसावी ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर बोलत होते. प्रा. गोसावी पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान हे केवळ एका जातीसाठी नसून, ते संपूर्ण देशासाठी आहे. संविधान जगाला समजले, पण आम्हाला समजले नाही. प्रारंभी कपिल कांबळे यांनी धम्म वंदनेचे गायन केले. क्रांतिज्योती महिला मंडळ, प्रतिभानगर यांच्यावतीने परिवर्तन गीत सादर करण्यात आले. माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, उत्तम पाटील, नगराध्यक्ष जयवंत भाटले, जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, दलित क्रांती सेना अध्यक्ष अशोक कुमार असोदे, राजेश कदम, लक्ष्मणराव चिंगळे, गणी पटेल, आय. एन. बेग, राजू पाटील, अच्युत माने, दिलीप पठाडे, संजय सांगावकर, प्रा. सुरेश कांबळे, अमित शिंदे उपस्थित होते
निपाणी : फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलनात प्रा. यशवंत गोसावी यांनी विचार मांडले.