कोल्हापूर : मुलगा हाच वंशाचा दिवा नसून मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते आणि मुली देखील कर्तृत्वान असतात असे प्रबोधन वक्तृत्वातून करणाऱ्या गाडेगोंडवाडी (ता.करवीर) येथील दिव्या दीपक मेटील या विद्यार्थिनीने तिच्या भाषणातील विचारांप्रमाणे स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. दहावीला दिव्याने सेमी इंग्रजी माध्यामातून ९२ टक्के गुण मिळवत मुलगी देखील कर्तृत्ववान असते हे दाखवून दिले आहे. भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेऊन स्वतःला आणखी सिद्ध करायचे आहे अशी भावना तिने व्यक्त केली.
देवाळे (ता. करवीर) येथील न्यू हायस्कूलची ती सेमी इंग्रजीची विद्यार्थिनी आहे. वडील दीपक मेटील शेतकरी असून लोकमतचे बातमीदार आहेत. आई अर्चना गृहिणी असून वडिलांसोबत शेतीच्या कामात मदत करतात. लहानपणापासून अभ्यास आणि वक्तृत्वात विशेष गती असणारी दिव्या ही तिच्या आईवडिलांचं एकुलती एक आहे.
वक्तृत्व स्पर्धांमधून 'लेक वाचवा' विषयावर प्रबोधन
गेली अनेक वर्षे विविध वक्तृत्व स्पर्धांमधून लेक वाचवा या विषयावर ती प्रबोधनपर भाषणे देत आहे. पण ती आपले विचार फक्त भाषणांमधून समाजाला सांगत नाही तर खरोखर मुली या गुणवाण असतात हे तिने तिच्या कृतीने देखील सिद्ध केले आहे. मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक आईवडिलांचे डोळे दहावीच्या निकालातील मुलींची गुणवत्ता बघून उघडले असतील. वंशाला मुलगाच हवा असा अट्टहास करणाऱ्या अनेकांना दिव्याच्या निकालाने विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.