कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निष्काळजी व मनमानी कारभाराच्या विरोधात गुरुवारी दिव्यांग सेनेच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सेनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन उपायुक्त निखिल मोरे यांना देण्यात आले, तर महानगरपालिका दिव्यांगांसाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या हक्काचा ६० ते ७० टक्के निधी खर्च केला जात नाही, तो अन्य कामांकडे वर्ग केला जातो. केएमटी बस सेवा मोफत मिळत नाही. दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहन खरेदीसाठी अनुदान देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तक्रार निवारण अधिकाऱ्याची अद्याप नेमणूक करण्यात आलेली नाही, अशा तक्रारी दिव्यांग सेनेने केल्या आहेत. दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
उपोषणास बसलेल्यांमध्ये नारायण मडके, उत्तम चौगुले, विकी मल्होत्रा, तुकाराम हारुगडे, शरद भोसले, संजय आडके यांचा समावेश होता. सायंकाळी सहायक आयुक्त संदीप घार्गे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्याचे आश्वासन दिले.