कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथील क्रांती हॅन्डीकॅप्ड हेल्प मल्टिपर्पज फौंडेशनच्या वसतिगृहातील दिव्यांग नीलम सुतारचा विवाह करंजिवणे (ता. कागल) येथील अनिल सुतार यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाला.नीलम ही गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या वसतिगृहात राहत होती. तिचा विवाह करंजिवणे (ता. कागल) येथील सुतार यांच्याशी ठरला. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने माहेरचा भार संस्थेने उचलला. सोन्याचे मणी मंगळसूत्र ते संसार साहित्य, कपडे, भोजनापर्यंतची व्यवस्था संस्थेच्या अध्यक्षा मंजूषा आडके व संजय आडकेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनी उचलली. त्यामुळे दिव्यांग असणारे दोन जीव लग्नगाठीत अडकले.
विशेष म्हणजे आतापर्यंत एक डझनभर दिव्यांगांसह गरीब मुलींचे विवाह संस्थेच्यावतीने करण्यात आले आहेत. दिव्यांग व गरीब विद्यार्थिनींना मोफत राहण्याची संस्थेच्यावतीने सोय करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यास नातेवाईकांसह ऋतुजा रेळेकर, संजीव घोलप, बाळासाहेब लवटे, सुशील रेळेकर, स्मिता घोलप, गजानन सुभेदार, आशिष खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.