कोल्हापूर : दिव्यांगांचा तीन टक्के निधी राखीव खात्यात जमा करा, त्यांच्यासाठी केएमटी बसचा प्रवास मोफत करावा, दिव्यांगांना केबिन्स द्याव्यात अशा प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन, कोल्हापूर या संघटनेच्या उपोषणाला शनिवारी, दिवाळी सणादिवशी यश आले. याप्रश्नी महापौर अश्विनी रामाणे यांच्या उपस्थितीत १४ नोव्हेंबरला महापालिकेत बैठक होणार आहे.महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या ताराबाई पार्कातील निवासस्थानाजवळ शनिवारी सकाळी दिव्यांगांनी खर्डा-भाकर ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तासांपर्यंत निवासस्थानाजवळ दिव्यांगांनी ठिय्या मारला होता. दुपारी कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते प्रवीण केसरकर, आदी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार आयुक्त पी. शिवशंकर यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ताराबाई गार्डनमधील निवडणूक कार्यालयात पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत सुमारे तासभर बैठक झाली. या बैठकीत अपंगांचा तीन टक्के निधी थेट खात्यात जमा करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे शहरातील सुमारे दीड हजार दिव्यांगांना त्याचा लाभ होणार आहे.या ठिय्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, शहराध्यक्ष प्रशांत म्हेत्तर, महिला शहराध्यक्ष शर्मिली इनामदार, संजय जाधव, संदीप दळवी, अमित गौड, शैलेश सातपुते, विकास चौगुले, शाबेरा मुजावर, रंजना गुलाईकर, अक्षय म्हेत्तर, रामचंद्र वडेर, मयूर जाधव, राजाराम भोईटे, उज्ज्वला चव्हाण, उमेश चटके यांच्यासह दिव्यांग बांधवांचा सहभाग होता.अंमलबजावणी नसल्याने आंदोलनकेंद्राने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी १ जानेवारी १९९६ पासून निधी लागू केला. या कायद्यान्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिव्यांगांसाठी तीन टक्के निधी खर्च करण्याबाबत नगरविकास विभागाने ३० आॅक्टोबर २०१० रोजी आदेश दिले. हा निधी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांनी दिव्यांगांना दिला; पण महापालिका प्रशासनाने याची अंमलबजावणी केली नसल्यामुळे हे आंदोलन केले असल्याचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या ताराबाई पार्क येथील निवासस्थानी प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेने शनिवारी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.
दिव्यांगांना तीन टक्के थेट खात्यात
By admin | Published: October 30, 2016 12:29 AM