कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित दिवाकर बापूसो कारंडे (वय ५४, रा. तिवले गल्ली कळंबा) यास अखेर सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्यास दि. १२ डिसेंबरपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गेले दीड वर्ष कारंडे याने अटकपूर्व जामीन मिळविण्याचा उच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केला, परंतु न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने पोलिसात हजर होण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. याप्रकरणी आतापर्यंत अन्य दोघांना अटक झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.महानगरपालिकेत कर निर्धारक व संग्राहक म्हणून जबाबदारीच्या पदावर दिवाकर बापूसो कारंडे काम करत होता. त्यादरम्यान दि. १ एप्रिल २०१४ ते १२ फेब्रुवारी २०२० या कालावधीत कारंडे याच्यासह तत्कालीन अधीक्षक नितीन नंदवाळकर, अधीक्षक अनिरुध्द प्रमोद शेटे, लिपिक विजय तुकाराम खातू या सर्वांनी बेकायदेशीरपणे भाडे दुरुस्ती तसेच अंमल दुरुस्ती करून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
त्यामुळे २८ फेब्रुवारी २०२० रोजी सर्वांना निलंबित करण्यात आले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दि. १३ जून २०२० रोजी तत्कालीन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या आदेशानुसार करनिर्धारक संजय भोसले यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी नितीन राजाराम नंदवाळकर व विजय तुकाराम खातू या दोघांना तत्काळ अटक केली. कारंडे व अनिरुध्द शेटे यांचा पोलिस शोध घेत होते. या दोघांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला.रम्यानच्या काळात शेटे यांचे निधन झाले. कारंडे यास नोकरीत पूर्ववत सामावून घेण्यात आले. उच्च न्यायालयात माजी नगरसेवक जयंत पाटील यांनीही सहभागी होऊन कारंडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर व्हावा म्हणून युक्तिवाद केला. जामीन अर्ज नामंजूर होताच कारंडे पुन्हा रजा काढून अज्ञातवासात गेला.
मध्यस्थाकरवी करवून घेतली अटकघरफाळा घोटाळा प्रकरणाला अनेक वळणे मिळाली. फिर्यांद देणाऱ्या संजय भोसले यांच्याविरोधात भूपाल शेटे यांनी पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत. त्याचीही चौकशी सुरू आहे. भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी शेटे यांची मागणी आहे. परंतु अटक होत नाही म्हणून शेटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केला आहे. त्यात प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. कारंडे याने एका माजी नगरसेवकास मध्यस्थी घालून स्वत:ला अटक करवून घेतल्याची चर्चा आहे