कोल्हापूर : बालपणाची सोबत, कधी प्रेमाने सांभाळून घेणं, कधी जोराची भांडणं, कधी लटकेच रुसवे-फुगवे, पण कठीण प्रसंग आला की खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहणं... भावा-बहिणीच्या या नात्याचा गोडवा वाढविणारा ‘भाऊबीज’ सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या दीपोत्सवातील अखेरचा दिवस म्हणजे भाऊबीज. या सणात पती-पत्नी, भाऊ-बहीण अशा सगळ्या नात्यांचा उत्सव साजरा होता. आपल्या घरी सण साजरा केलेली सासुरवाशीण या दिवशी मात्र हमखास माहेरी येते.
प्रेमाच्या गप्पा रंगतात आणि हसण्या-खिदळण्याने लहान मुलांच्या अपूर्व उत्साहाने घर भरून जाते. दिवाळी पाडव्यानंतर दुसऱ्या दिवशी घरोघरी भाऊबीजेची लगबग सुरू झाली. भावाला आरोग्य, समृद्धी लाभावी यासाठी बहिणीने त्याचे औक्षण केले. गोड पदार्थ खाऊ घातले. भावा-बहिणीचे रक्ताचे नाते जितके महत्त्वाचे, तितकेच मानलेले नातेही.
शाळा, महाविद्यालयीन तसेच दैनंदिन आयुष्य जगत असताना अनेकांचे भावा-बहिणीचे नाते जुळते. हे नाते मानलेले असले तरी त्याचा गोडवा कमी होत नाही. तेच प्रेम, तोच रुसवाफुगवा आणि तोच आधार. त्यामुळे अनेकांनी या मानलेल्या भावा-बहिणींकडे जाऊन भाऊबीज सण साजरा केला.
सामाजिक संस्थांमध्येही भाऊबीजयाशिवाय अनेक सामाजिक संस्थांमध्येही भाऊबीज साजरी करण्यात आली. निराधारांचा आधार असलेले बालकल्याण संकुल, पोलीस, ट्रॅफिक पोलीस, अडीअडचणीला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला.