कोल्हापूर : ‘रूप पाहता लोचनी’, ‘भेटीलागे पंढरीनाथा जिवा लागली’, ‘शब्दावाचून फुलले सारे’, ‘मधुर धून वाजे सुन सजनी,’ ‘श्री अनंता मधुसूदना पद्मना नारायणा,’ ‘माझे जीवनगाणे’, ‘ हे सुरांनो चंद्र व्हा’ अशा सुमधुर गीतांनी रविवारी पहाटे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते, येथील गुणीदास फाउंडेशन व आकाशवाणी सांगली यांच्यातर्फे दिवाळीच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या ‘स्वर दीपावली’ या कार्यक्रमाचे. केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा प्रात:कालीन मैफलीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सानिया पाटणकर, सुरंजन खंडाळकर यांच्या गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. पहाटे सव्वासहा वाजता सुरू झालेली ही मैफल सकाळी नऊच्या दरम्यान संपली. या मैफलीची सुरुवात गणेशस्तवनाने झाली. सानिया पाटणकर यांनी ‘रूप पाहता लोचनी... तो हा विठ्ठल बरवा’ हे भक्तिगीत सादर करून साज चढविला; तर खंडाळकर यांनी त्यानंतर ‘भेटीलागे पंढरीनाथा जिवा लागली’, ‘शब्दावाचून फुलले सारे’, ‘मधुर धून वाजे सुन सजनी,’ ‘श्री अनंता मधुसूदना पद्मना नारायणा;’ तर पाटणकर यांनी पु. ल. देशपांडे यांचे ‘माझे जीवनगाणे’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, संगीत ‘मानापमान’मधील ‘युवती मनारागिनी’, ‘सुरतेची विजयतोची,’ ‘सौभाग्यलक्ष्मीयन नमो मॉँ’ अशी भक्तिगीते सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीचा शेवट ‘ठुमरी’ने झाली. त्याला रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. राजप्रसाद धर्माधिकारी, आशय कुलकर्णी, स्वप्निल साळोखे, विक्रम पाटील, केदार गुळवणी, सौरभ शिपूरकर यांनी साथसंगत केली. यावेळी गुणीदास फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष सप्रे यांनी स्वागत केले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, सांगली आकाशवाणीचे सुनील कुलकर्णी, कोल्हापूर आकाशवाणीचे प्रवीण चिपळूणकर, सतीश पडळकर उपस्थित होते. महेश्वरी गोखले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
‘स्वर’ उधळीत आली दिवाळी पहाट
By admin | Published: October 30, 2016 11:56 PM