कोल्हापूर : दिवाळी उत्सवात आज, बुधवारी सायंकाळी लक्ष्मी-कुबेर पूजनाचा सोहळा होणार आहे. यानिमित्त मंगळवारी बाजारपेठेत नागरिकांनी लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या साहित्याची खरेदी केली.दिवाळीत नरकचतुर्दशीनंतर लक्ष्मीपूजन येते. कुबेर आणि लक्ष्मी या दोन्ही देवता धन-संपत्ती देणारे मानले जातात. त्यामुळे घरात लक्ष्मी नांदावी, आर्थिक सुबत्ता यावी, नोकरी-व्यवसायात यश यावे, सुख, शांती लाभावी, यासाठी अमावस्येच्या सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत हे पूजन केले जाते. यानिमित्त मंगळवारी सायंकाळी बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाच्या साहित्यांची खरेदी केली जात होती.या लक्ष्मीकुबेर पूजनासाठी लागणारी केरसुणी, आंब्याची पाने, पानसुपारी, बदाम, प्रसादासाठी बत्तासे, चिरमुरे, सुवासिक अगरबत्ती, धूप, फळे, वही या साहित्याची खरेदी केली जात होती. ‘लक्ष्मीपूजन’ आणि ‘पाडवा’ या दोन्ही दिवशी झेंडूची फुले लागतात. त्यामुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली असून, ९० ते १२० रुपये किलो असा झेंडूचा दर होता.
यातही लाल, केशरी आणि पिवळ्या रंगांच्या फुलांना मागणी होती. त्यासह पूजेसाठी लागणारी पाच फळे ५० ते ६० रुपयांना मिळत होती. या साहित्याच्या खरेदीसाठी जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, महापालिका चौक, भाऊसिंगजी रोड, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट, बिंदू चौक या बाजारपेठांत नागरिकांनी गर्दी केली होती.