आंबा : मुलांच्या हाती आकाशकंदील व रांगोळी, तर सुनांच्या हाती साबण व साडी, सासवांच्या हाती फराळाची पिशवी तर पुरूषांच्या हाती अबाल-वृद्धापर्यंतचे कपडे मालाई धनगरवाड्यावरील धनगर समाजाच्या चेहरे खुलवणारे ठरले. निमित्त होते वाड्यावरच्या दिवाळी उत्सवाचे. शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठाच्या शंभर शिक्षकांनी प्रत्येकी पाचशे रुपये वर्गणी काढून दिवाळीपासून वंचित राहणाऱ्या कुटुंबात दिवाळी पोहोचविली. दिवाळीपूर्वी या व्यासपीठाने विद्यार्थ्यांची भेटकार्ड व कंदील बनवणारी कार्यशाळा घेऊन ती गेल्या दोन दिवसांत बाजारपेठेत विकली. जिथे दिवाळी साजरी होत नाही अशा वस्तीला दिवाळीची अनुभूती देण्यास पावनखिंडीलगतच्या दुर्गम मालाईवाड्यावरील प्रत्येक कुटुंबात दीड किलोचा फराळ, उटणे, साबण, सुवासिक तेल यासोबत कोडोली येथील शिवप्रतिष्ठानने देणगीदाराकडून मिळवलेले कपडे दिवाळी दिवशी पोहोच केले. वाड्यावरच्या चाळीस उंबऱ्यांचे कुंटूब शाळेच्या प्रांगणात जमले होते. प्रत्येक कुटुंबात ही दिवाळी भेट पोहचेल याची दक्षता कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एम. आर. पाटील म्हणाले, धनगरवाड्यावर जन्मला म्हणून दारिद्र्य घेऊन बसू नका, ज्ञानाचा दिवा प्रकाशित केला तरच मालाईसारख्या वस्त्यांना विकासाच्या वाटा सापडतील. पुढच्या पिढीत ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलीत करा. मुले हिच तुमची ताकद आहे.यावेळी विनायक हिरवे, सतीश वाकसे, कोडोलीचे सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संभाजी लोहार, प्रकाश काळे, राजेंद्र लाड, शिवप्रतिष्ठाणचे विनायक पाटील, संजय जगताप, शिक्षक बॅकेचे संचालक साहेब शेख, संघटनेचे प्रमुख बाबा सांळूखे यांचे सहकार्य लाभले. पन्नासभर शिक्षक घरची दिवाळी बाजूला ठेवून वाड्यावरच्या दिवाळीत रमली होती. (वार्ताहर) गुरूजींच्या भेटीमुळेचयंदा दिवाळीयेथील घरटी तरूण मुंबईला चाकरीस आहे. लहान मुले शाळेत तर महिला व वृद्धमंडळी रोजंदारीच्या मागे असतात. जंगली प्राण्यांमुळे शेती नाही. यंदा तर पावसाच्या अनियमितपणामुळे शेती पिकलीच नाही. दिवाळी कसली ती आम्ही नाही करीत. फराळ तर दूरच, गुरूजींच्या भेटीने यंदा दिवाळी होतेय असे गंगूबाई कोळापटे या वृध्देने स्पष्ट केले.
मालाईवाड्यावर वंचितांच्या घरी दिवाळीचा प्रकाश
By admin | Published: November 13, 2015 11:02 PM