रमेश पाटील -कसबा बावडा -व्यापारी वर्गाला कोणत्याही परिस्थितीत या सणाच्या काळात पैशांचा तुटवडा भासू नये, म्हणून कोल्हापुरातील बँकांच्या ‘ट्रेझरी’ आता अधिकच सतर्क झाल्या आहेत. बहुतेक ट्रेझरींमध्ये अब्जावधी रुपयांचा निधी शिल्लक ठेवला आहे. बँक शाखांकडून जेवढ्या रकमेची मागणी होईल, तेवढी मागणी पूर्ण केली जात आहे. यंदाच्या दिवाळी सणासाठी दहा अब्जांहून अधिक रकमेची गरज भासणार असल्याचे एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.दिवाळीसारख्या मोठ्या खर्चाच्या सणासाठी बँक ग्राहकांकडून एटीएममधून, तसेच प्रत्यक्ष बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन आठवडे पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्या तुलनेत पैसे बँकेत भरण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे दिवसेंदिवस या काळात बँकांच्या तिजोऱ्या काहीशा हलक्या होण्यास सुरुवात होते. बँकांच्या तिजोऱ्या जरी हलक्या होत गेल्या तरी, त्यांना ट्रेझरीमार्फत पैशांचा पुरवठा होत असतो. त्यामुळे बँकांत कधीही पैशांचा तुटवडा जाणवत नसतो. मात्र, दिवाळीच्या अगोदर काही दिवस म्हणजे शेवटच्या तीन-चार दिवसांत बँकांना पैशांची टंचाई काही प्रमाणात जाणवू लागते. कारण पैसे असूनही रिझर्व्ह बँकेकडून ‘मागणी तसा पुरवठा’ वेळेत होऊ शकत नसल्यामुळे, यंदा मात्र अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण दसरा सणावेळी रिझर्व्ह बँकेकडून बऱ्यापैकी निधी येथील ट्रेझरीकडे आला आहे. तसेच बँकांनीही मोठ्या प्रमाणात या सणाची तरतूद म्हणून निधी राखीव ठेवला आहे. सामान्य ग्राहक किंवा पगारदार नोकर मंडळी ही बँकांच्या एटीएममधून पैसे काढतात. तर मोठमोठ्या संस्था, कंपन्या बोनससाठी रोख रकमेची मागणी करतात. साखर कारखाने सुद्धा दिवाळीच्या तोंडावर हप्ता देतात. त्यामुळे या काळात बँकांतून खूप मोठ्या प्रमाणात रक्कम काढली जाते. त्याचा सारा परिणाम बँकांच्या तिजोरीप्रमाणे ट्रेझरी शाखांवरही होत असतो.दररोज एटीएममधून व बँकांतून पैसे किती काढले, याची आकडेवारी रिझर्व्ह बॅकेला समजते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेकडून पैशांचा पुरवठा बँकांना होतो. दिवाळीच्या काळात बँका मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडे पैशांची मागणी करतात. त्या पटीत रिझर्व्ह बँकेकडून शाखांना पैसे येत नाहीत.एटीएममधून दररोज पाच कोटीसध्या दिवाळीमुळे जिल्ह्यातील चारशेंहून अधिक एटीएम सेंटरमधून दररोज सुमारे पाच कोटींहून अधिक रक्कम काढली जात आहे. येत्या काही दिवसांत त्यामध्ये वाढ होण्याची आणखी शक्यता आहे, अशी माहिती बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक (आय.टी.) विनपकुमार मिश्रा यांनी दिली.
दिवाळीला आता पैशांचा तुटवडा नसणार
By admin | Published: October 19, 2016 12:41 AM