कोल्हापूर : बहुजन नायक महाप्रतापी बळिराजाचे स्मरण करून बहुजनांच्या एकतेची दिवाळी साजरी करा, असे आवाहन बळिराजा महोत्सव समितीचे सचिव दिगंबर लोहार यांनी येथे केले.बलिप्रतिपदेनिमित्त बिंदू चौक येथे बळिराजा प्रतिमापूजन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. डॉ. टी. एस. पाटील, बाबूराव कदम, रवी जाधव, बबन रानगे, बाळासाहेब भोसले, गौतम कांबळे, सुभाष सावंत, चंद्रकांत यादव, सुभाष वाणी, धनाजीराव जाधव, बाबा महाडिक, सुशांत बोरगे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुप्रिया कदम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास, तर सुभाष सावंत यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.प्रा. डॉ. टी. एस. पाटील यांनी महोत्सवाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर उपस्थित महिलांच्या हस्ते बहुजन नायक महाप्रतापी बळिराजाचा घातपात करणाऱ्या ‘वामन प्रवृत्ती’चे प्रतीक म्हणून मडके फोडण्यात आले. यावेळी बळिराजाचा विजय असो... छत्रपती शिवाजी महाराज की जय... महात्मा जोतीराव फुले यांचा विजय असो... राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो... असा जयघोष करण्यात आला. या जयघोषाने परिसर दणाणून गेला.दिगंबर लोहार म्हणाले, बळिराजाची संस्कृतीही शेतीक्रांतीची होती. बहीण-भावाच्या पवित्र नात्याची वीण बळिवंश संस्कृतीत आहे. हीच खरी भारतीय संस्कृती आहे. शेतीच्या सुगीच्या दिवसांत बहिणीने आपल्या भावाला शेतीकामात केलेल्या मदतीबद्दल केलेला सण म्हणजे दिवाळी सण होय. त्यामुळे बहुजनांचा सर्वांत मोठा सण बळिराजा संस्कृतीचा मानबिंदू असल्यानेच वेदिकांनी बळिराजाचा खोटा इतिहास लिहून, त्याला विकृत करून, लोकनायक, जननायक असलेल्या मूळ भारतीय सम्राटास ‘राक्षस’ अशी उपमा दिली. तरीही बहुजन लोक बळिराजाला विसरू शकले नाहीत. ग्रामीण लोकगीतांतून आजही बहुजन स्त्रिया ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हणून भाऊबीजेला भाऊरायाला ओवाळतात.यावेळी राजाराम धनवडे, सचिन घाटगे, एम. बी. पडवळे, पी. ए. कुंभार, अस्लम बागवान, सरदार पाटील, सरोज कांबळे, अरुण पाटील यांच्यासह पुरोगामी विचारांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बहुजनांच्या एकतेची दिवाळी करा
By admin | Published: November 14, 2015 12:23 AM