इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधत पर्यावरणपूरक तुरटीपासून ‘श्रीं’च्या मूर्तीची स्थापना केली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती एक फुटामध्ये बसवली असून, यासाठी पाचशे रुपये खर्च आला आहे. चार किलो तुरटीसाठी १६० रुपये, पीओपी डाय व रबर मोल्टसाठी २४० रुपये व इतर १०० रुपये असा खर्च झालेला आहे.
सुरुवातीला तुरटी वितळवून घेऊन गणेशमूर्तीच्या छाप्यामध्ये ओतली. ठरावीक वेळेनंतर सुबक अशी ‘श्रीं’ची मूर्ती तयार झाली. अशा प्रकारे सर्वसामान्यांना परवडेल अशा बजेटमध्ये वजनास हलकी व हाताळण्यास सोपी अशी मूर्तीची निर्मिती केली आहे. राहत्या घरीदेखील बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन केल्यास हे पाणी शुद्ध होऊन या पाण्याचा वापर घरगुती वापरासाठी करू शकतो.या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव सपना आवाडे, सुनील पाटील, एस. डी. पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रा. सुयोग रायजाधव, प्रा.डॉ. पी. व्ही. कडोले, विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक, प्रा.डॉ. व्ही. डी. शिंदे, प्रा. ए. आर. बलवान यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
१५०९२०२१-आयसीएच-०२
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी तुरटीपासून गणेशमूर्ती तयार केली आहे.