दीपावलीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मतिमंद शाळेत आणि वृद्धाश्रमात जाऊन मतिमंद मुले आणि वृद्धांशी संवाद साधतात आणि दीपावली फराळाच्या पदार्थांचा त्यांच्याबरोबर आस्वाद घेतात. ही संकल्पना साकारली आहे डीकेटीईच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे हे पथक गेली आठ वर्षे हा उपक्रम राबवीत आहे.डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे हे पथक चोकाक (ता. हातकणंगले) येथील वृद्धाश्रमात गेल्यानंतर त्यांनी आश्रमाची अंतर्गत व बाहेरील आवाराचीही साफसफाई केली. आकाशदिवा लावला आणि त्यांनी फराळाचे साहित्य देतानाच तेथे असलेले वृद्ध पुरुष व महिला यांच्याशी संवाद साधला. त्यांचे दु:ख जाणून घेतानाच त्यांच्याशी थोडासा आनंद वाटत हास्यविनोदही केला. त्यांना दीपावलीसाठी साबण, तेल, उटणे अशा वस्तू दिल्या. त्यांच्याबरोबर त्यांनी एक दिवस व्यतीत केला.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या या पथकाने सन्मती मतिमंद विकास केंद्रातील विद्यार्थी दत्तक योजनेसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला. विद्यार्थी-विद्यार्थिनींना दीपावलीचा फराळ दिला आणि तेथे आकाशकंदीलही बांधला. यावेळी प्रा. आश्विनी रायबागे, प्रा. सचिन कानिटकर, प्रा. पी. ए. पाटील, प्रेमनाथ पवार, आदी उपस्थित होते. त्यांच्या मदतीने वृद्धाश्रम व मतिमंद शाळा या दोन्ही ठिकाणी एक कौटुंबिक वातावरण तयार केले. असा उपक्रम दरवर्षी राबविणार असल्याची माहिती देण्यात आली.
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधीलकी
By admin | Published: November 11, 2015 9:47 PM