कोल्हापूर/ शिरवळ : कुख्यात गुंड लहू रामचंद्र ढेकणे (वय ३९, रा. देगाव, ता. भोर, जि. पुणे) याचा सुपारी देऊन निर्घृण खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, शिर व हातांचे पंजे नसलेला, तसेच उर्वरित शरीरावर कोणताही जुना व्रण नसताना त्याच्या भावाने त्याचा मृतदेह ओळखला कसा, अशी शंका पोलिसांना आहे. स्वत:च्या बचावासाठी दुसऱ्याच व्यक्तीचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्याने केलेला असू शकतो. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या तो त्याचाच मृतदेह आहे का, हे सिद्ध करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मृत लहू व त्याचा भाऊ अंकुश या दोघांच्या रक्ताचे नमुने रविवारी सकाळी मुंबई येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेस (फॉरेन्सिक लॅब) पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव यांनी दिली. गिरगाव (ता. करवीर) येथील गवती डोंगरावर शनिवारी (दि. १६) शिर व हातांचे पंजे तोडलेला मृतदेह पोलिसांना आढळला. मृतदेहाच्या पॅँटच्या खिशातील डायरी व मतदान ओळखपत्रामुळे गुंड ढेकणे याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचा भाऊ अंकुश ढेकणे याने हा लहूचाच मृतदेह असल्याचे कोल्हापूर पोलिसांना सांगितले. ढेकणे याने स्वत:च्या बचावासाठी दुसऱ्याच व्यक्तीचा खून करून आपला खून झाल्याचा बनाव करण्यासाठी मृतदेहाच्या खिशामध्ये डायरी व मतदान ओळखपत्र ठेवल्याची शक्यता नाकारता येत नाही. ढेकणे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्या हातांचे ठसे पोलीस ठाण्यात उपलब्ध होऊ शकतात. त्यावरून मृतदेह कोणाचा आहे, हे पोलीस सिद्ध करतील. त्यामुळे चलाखीने पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने हातांचे पंजेही तोडून टाकल्याची शक्यता आहे. शिर व हातांचे पंजे नसलेला तसेच उर्वरित शरीरावर जुना व्रण नसताना त्याच्या भावाने मृतदेह ओळखला कसा, अशी शंका पोलिसांना आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या तो त्याचाच मृतदेह आहे का, हे सिद्ध करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी मृत लहू व त्याचा भाऊ अंकुश या दोघांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेस पाठविले. ढेकणे याच्याविरोधात पुणे व सातारा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. कळंबा मध्यवर्ती कारागृहात तो पंधरा वर्षांपासून आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पुणे, सातारा, जयसिंगपूर, इचलकरंजी, कऱ्हाड, आदी परिसरात पथके रवाना केली आहेत. त्याच्या भावाचेही कॉल डिटेल्स पोलीस शोधत आहेत. सध्या मृतदेह सीपीआर रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून, दोन दिवसांनी त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गुंड ढेकणेच्या मृतदेहाची ‘डीएनए’ चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2015 12:50 AM