कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आपली तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेण्यात आली. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे ३० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे यांनी या बैठकीत दिल्या.
मार्च महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मतानुसार कदाचित एप्रिलमध्ये रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे डॉ. साळे यांनी पिवळा वाडा येथे या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. फारूक देसाई, डॉ. उषादेवी कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. साळे म्हणाले, राज्यातील अन्य जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हे प्रमाण नियंत्रणामध्ये असले तरीही गेल्या महिन्याच्या शेवटापासून ही संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे कोरोनाकडे आणि उपचार प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. सध्या जिल्ह्यात रोज १५०० स्वॅब तपासण्याची क्षमता आहे. मात्र रोज एक हजार नागरिकांचेच स्वॅब घेतले जात आहेत. त्यामुळे चाचण्या वाढण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. पुन्हा एकदा गाववार सर्वेक्षण करण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासही सांगण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी छाेटी आणि मोठी ऑक्सिजन सिलिंडर्स देण्यात आले आहेत, ती भरून घ्यावीत, कोरोना काळात खाटा, गाद्या आणि अन्य आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले आहे. ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, प्रतिबंधित क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेऊन त्यांच्या कामाचे फेरवेळापत्रक करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
चौकट
लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज
यावेळी सूचना देताना लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना डॉ. साळे यांनी केली. ते म्हणाले, कोरोनाचा आणखी संसर्ग वाढण्याआधी अधिकाधिक नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना नंतर कोरोनाच्या लाटेतही त्रास होणार नाही. पोलीस, महसूल आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यासाठी लसीकरणासाठी उद्युक्त करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.