कोल्हापूर: जिल्ह्यातील कोरोना रुग्णदर कमी होण्यासाठी तपासण्या वाढविण्यात याव्यात. नेमून दिलेले उद्दिष्ट साध्य करावे. झालेल्या तपासण्यांची माहिती तत्काळ ऑनलाईन भरावी. या कामात हलगर्जीपणा होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले.जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या तपासण्या, ऑनलाईन माहिती भरणे, संपर्क शोध, आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ते बोलत होते. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रोज १५ हजारांहून अधिक तपासण्या होत आहेत.
शहरासह ग्रामीण भागात तपासण्यांची संख्या वाढवून उद्दिष्ट पूर्ण करा. त्या-त्या भागासाठी देण्यात आलेल्या 'टेस्टिंग किट्स' मधून आतापर्यंत झालेल्या तपासण्यांच्या नोंदी व शिल्लक किट्सची माहिती वेळोवेळी सादर करा. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीचे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) प्रमाण वाढवावे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एन. देवकर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, अश्विनी सोनवणे-जिरंगे, आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले.सूक्ष्म नियोजनाने काम कराजिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट कमी होण्यासाठी संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी ह्यसूक्ष्म नियोजनह्ण करून समन्वयाने काम करावे. अधिकाधिक नागरिकांच्या तपासण्या करून घेऊन 'डाटा एन्ट्री' करावी. या कामासाठी आवश्यक ते मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.