कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थती अत्यंत बिकट असताना तसेच घरफाळा, नगररचना, पाणीपट्टी, केएमटी यासारख्या आर्थिक उत्पन्नाच्या संस्थांकडून ठोस उत्पन्न मिळत नसताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे योग्य नाही. त्यामुळे झालेला निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथील नागरिकांनी तसेच ई वॉर्ड समितीने बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक मंदी आहे. सर्व उद्योगधंदे नुकसानीत आहेत. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पगार पन्नास टक्के कमी केले आहेत. सामान्य नागरिकांना जगणे अवघड झाले आहे. अशा प्रचंड आर्थिक अडचणीच्या काळात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून त्याचा संपूर्ण आर्थिक बोजा मेटाकुटीने जगणाऱ्या शहरातील नागरिकांवर लादणे योग्य नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेचा जन्म व मृत्यू दाखला मिळविण्यासाठी घरफाळा भरल्याच्या पावतीची सक्ती केली आहे, ती पूर्णत: चुकीची आहे. व्यक्तीचा नैसर्गिक जन्म व मृत्यू येतो. त्याची नोंद ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असताना कोणत्याही प्रकारची सक्ती केल्यास कोल्हापुरात आंदोलन होईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.