कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाड्या करून नव्हे, तर घड्याळ चिन्हावरच लढवाव्यात. जागा कमी आल्या तरी चालतील; पण घड्याळ चिन्हाच्या माध्यमातूनच पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत घेऊन जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी कोल्हापुरातून फुंकल्याची घोषणा करत आगामी काळात राष्ट्रवादी महाराष्ट्रात ‘नंबर वन’चा पक्ष असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा रविवारी कोल्हापुरात झाला, त्यावेळी ते बोलत होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या मेळाव्यात राज्य सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवत तटकरे म्हणाले, २००४ ला ‘एनडीए’ सरकारने फिल गुड, इंडिया शायनिंगचा नारा दिला; पण ‘यूपीए’च्या नेतृत्वाखाली सरकार देशात सत्तेवर आले. दहा वर्षांच्या काळात या सरकारने लोकहिताचे निर्णय घेतले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुका या व्यक्तिसापेक्ष झाल्या. जनतेला ‘अच्छे दिन’चा नारा देत भाजपचे सरकार आले. या सरकारने किती लोकहिताचे निर्णय घेतले हे जनतेला दिसून आले. अशा निष्क्रिय सरकारला धडा शिकवण्याची ताकद पुरोगामी कोल्हापूरच्या जनतेत आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून दोनवेळा जिल्हा परिषदेत सत्ता आली; पण गेल्यावेळी आम्ही कमी पडलो. त्यामुळे यावेळेला जिल्ह्णातील नऊ नगरपालिका व जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेंडा फडकवून जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचा शब्द आपण देत आहे. खासदार धनंजय महाडिक, के. पी. पाटील, निवेदिता माने, इलियास नायकवडी, ए. वाय. पाटील, राजेश लाटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, सांगली जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपमहापौर शमा मुल्ला, आदी उपस्थित होते. आर. के. पोवार यांनी आभार मानले. यावेळी शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवार, टॉप थ्री खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल धनंजय महाडिक, मीडिया सेलचे प्रमुख सारंग पाटील यासह स्केटिंगपटू राम संतोष यादव व सिद्धी शिरवडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
आघाड्या नको, घड्याळावर लढवा
By admin | Published: June 27, 2016 1:11 AM