इचलकरंजी : शहरातील शांतता अबाधित राखत असताना कायदा व सुव्यवस्थेच्या आडवे येणाऱ्या कोणाचीही गय करू नका. तो कोणत्याही पक्षाचा, गटाचा असो. लोकप्रतिनिधी म्हणून आपला यासाठी नेहमी पाठिंबा असेल, असे मत आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीनही पोलीस ठाण्यांच्यावतीने आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हाळवणकर बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली. त्याप्रमाणेच सर्वजण मिळून येणारी शिवजयंतीही उत्साहात व शांततेत पार पाडावी. अवाढव्य फलक लावणे, पुंगळ्या काढून गाड्या पळविणे यासह वावगे प्रकार कोणीही करू नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पावित्र्य राखावे. तसेच पोलिसांनीही जनसामान्यांसह शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांशी आपले नाते घट्ट करावे. पोलीस ठाणे जनतेला आधार वाटले पाहिजे, असा सल्लाही पोलिसांना दिला.यावेळी अनेक नागरिकांनी आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने दारूमुळे दंगा होतो. म्हणून दारू विक्री बंद ठेवावी. तसेच डिजिटल फलक उभारणाऱ्यांनी त्याची जबाबदारी स्वत: घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या. याप्रसंगी माजी आमदार राजीव आवळे, अजित जाधव, हिंदूराव शेळके, कबनूरच्या सरपंच खालिदा फकीर, अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, आदींसह शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
कायदा व सुव्यवस्थेत हयगय नको
By admin | Published: April 18, 2016 11:59 PM