कणकवली : वाहतूक कोंडीचे कारण देत सिंधुदुर्गातील बसेस रंकाळा आणि मध्यवर्ती बसस्थानकावर न आणता संभाजीनगर आगार येथे थांबवून मागे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे सिंधुदुर्गातील प्रवाशांना भुर्दंड पडत आहे. याचा सिंधुदुर्गातील एसटी वाहतुकीवर परिणाम होणार असून इंटक याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करील, असा इशारा संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी दिला आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून पुढे पुणे, सांगली, सातारा आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेस रंकाळा स्थानकावर न आणता नवीन वाशीनाका, संभाजीनगर, विद्यापीठ कॉर्नर, रेल्वे फाटक, ताराराणी चौकमार्गे मध्यवर्ती बसस्थानकावरून येऊन पुढे मार्गस्थ करण्याचे ठरवले आहे. हा मार्गबदल फक्त सिंंधुदुर्गातील गाड्यांच्या बाबतीत करण्यात आला आहे. वास्तविक कोल्हापूर विभागाच्या गारगोटीकडे १३० फेऱ्या असून मुरगूड व गारगोटी फेऱ्या प्रचंड वर्दळ असणाऱ्या गोखले कॉलेज, लक्ष्मीपुरी या मार्गावरून चालवल्या जातात. सद्यस्थितीत कोल्हापूर विभागाच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटणाऱ्या कोल्हापूर विभागाच्या फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करताना गोवा व कर्नाटक राज्य परिवहनच्या गाड्या मात्र बिनदिक्कत जुन्या मार्गानेच ये-जा करत आहेत. तसेच वाहतूक कोंडीही कमी झालेली दिसत नाही. मात्र, या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील व्यापारी, प्रवाशांची प्रचंड गैरसोय झालेली आहे. या निर्णयाचा तात्काळ फेरविचार होण्याची आवश्यकता असून इंटकचा या निर्णयास तीव्र विरोध असल्याचे पत्रकात म्हटले आहे.कोल्हापूर येथील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचा बोजा सिंधुदुर्गवासीयांना भोगावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने याबाबत त्वरित दखल घेण्याची मागणी इंटकतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)भारमानात लक्षणीय घटगगनबावडा मार्गावर एक टप्प्याने व फोंडा मार्गावर एका टप्प्याने वाढ होणार आहे. आधीच मार्ग बदल केल्याने या विभागाच्या फेऱ्यांना अर्धा ते पाऊण तास फेरा मारून यावा लागतो. या सर्व बदलांचा अनिष्ट परिणाम सिंधुदुर्ग विभागाच्या सर्व फेऱ्यांवर होऊन भारमानात लक्षणीय घट झाली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीस मोठी वाढ झाली आहे. बसेस संभाजीनगर येथे प्रवास संपवत असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे तीव्र असंतोष पसरला आहे.
बसेसचा थांबा बदलू नका
By admin | Published: January 07, 2015 10:37 PM