लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : नव्या पिढीला सलून व्यवसायाकडे वळविणे हे आमच्यासमोर आव्हान आहे. ते पेलतानाच या व्यवसायाला फॅमिली सलूनचे स्वरूप कसे देता येईल, असा आमचा समाज म्हणून प्रयत्न असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी येथे दिली. नाभिक समाज सलूनचे दुकान चालवितो. महिला ब्युटी पार्लर चालवितात. हा आमचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे व तो आम्ही उजळमाथ्याने करतो; परंतु मसाज हा चोरून केला जाणारा व्यवसाय असून, त्यावरील छाप्यावेळी पोलिसांनी व प्रसारमाध्यमांनीही ‘पार्लर’ शब्दाचा वापर करून आमची बदनामी करू नये, अशी अपेक्षा या समाजाने व्यक्त केली.‘लोकमत’च्या ‘वाचक भेट संवाद’ कार्यक्रमात या समाजाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या लक्ष्मीपुरीतील शहर कार्यालयास भेट दिली व ‘लोकमत’कडून व समाजाकडूनही काय अपेक्षा आहेत, त्याची मांडणी केली. ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक (वितरण वृद्धी) संजय पाटील व मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी चर्चेत कोल्हापूर जिल्हा सलून दुकानमालक असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत मांडरेकर, महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांच्यासह मनोहर झेंडे, दीपक माने, रामचंद्र संकपाळ, लहू ताटे, प्रमोद झेंडे, श्रीकांत झेंडे, भगवान काशीद, केशव यादव, प्रभाकर भोगुलकर, चंद्रकांत राऊत, तानाजी कोरे, विवेक सूर्यवंशी, दीपक खराडे, मोहन साळोखे यांनी भाग घेतला.पूर्वीपासून बारा बलुतेदार पद्धतीनुसार ‘एक कुटुंब, एक नाभिक, एक कुंभार’ असा गावगाडा होता; परंतु पुढे जसे सगळ्याच व्यवसायांचे स्थित्यंतर झाले तशा लोकांच्याही आवडीनिवडी बदलल्या. त्यामुळे ‘एक कुटुंब एक नाभिक’ ही संकल्पना लुप्त झाली; परंतु आम्हाला पुन्हा आता ‘एक फॅमिली एक सलून’ या दिशेने जायचे आहे. त्यासाठी आम्ही आमच्या दुकानात जे आवश्यक आहे ते बदल करण्यास तयार आहोत. दुकानात मुलगाही आला पाहिजे व वडीलही आले पाहिजेत, असा दोन पिढ्यांना सांधणारा व्यवसाय करीत गेलो, तरच हा व्यवसाय समृद्ध होणार आहे, याची जाणीव आम्हाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.कोल्हापुरात गेल्या काही महिन्यांत मसाज पार्लरवर छापे पडले. त्याच्या बातम्या वाचून लोकांच्या मनात ‘पार्लर’ या शब्दाविषयीच शंका येऊ लागली आहे. आम्ही लोकांचे केस कापतो, त्यांच्या सौंदर्यात भर घालतो; परंतु तिथे कोणतेही गैरउद्योग केले जात नाहीत. पार्लरवर छापा म्हटले की, त्यातून चुकीचा अर्थ ध्वनीत होतो. त्यामुळे मसाज ‘पार्लर’ऐवजी मसाज सेंटरवर छापे असे म्हटले जावे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. ‘लोकमत’ यापुढे अशा कोणत्याही बातम्यांमध्ये ही दक्षता घेईल, असे स्पष्ट केले. ‘लोकमत’चे आभार नाभिक समाजाच्या लोकांना कार्यालयात बोलावून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने सर्वप्रथम केला आहे. ‘लोकमत’ने आम्हाला प्रश्न मांडण्याची संधी तर दिलीच, त्याशिवाय हा सन्मान दिल्याबद्दल समाजाच्यावतीने विवेक सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.३२१ ‘लोकमत’मध्ये राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील उत्तम कव्हरेज येते.‘लोकमत’ वाचल्यानंतर आमची वाचनाची भूक भागते म्हणून आम्ही हा अंक घेतो. बहुतांशी सर्व सलून दुकानात ‘लोकमत’चा अंक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सलून व्यावसायिक एखादे वृत्तपत्र कमी किमतीत मिळते किंवा गिफ्ट मिळते म्हणून नव्हे, तर चांगला अंक असेल तरच घेतो. त्या कसोटीवर ‘लोकमत’ उतरला असल्याचेही या व्यावसायिकांनी यावेळी आवर्जून सांगितले. इतर सर्व क्षेत्रांत दरवाढ होते तशी दरवाढ सलून व्यावसायिकांतही केल्यावर ग्रामीण भागात काही ठिकाणी समाजावर बहिष्कार टाकला जातो. हा समाज लोकसंख्येने कमी असल्याने भीती दाखविली जाते. अशा वेळी समाज म्हणून आम्ही नाभिक बांधवाला पाठबळ देत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सामाजिक कार्यात पुढेहा समाज सामाजिक कार्यातही पुढे आहे. रंकाळा बसस्थानकासमोर राजर्षी शाहू महाराजांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेत संतसेना महाराज वसतिगृह चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कायम शंभर टक्के वसुली असलेली करवीर नाभिक सोसायटीही उत्तम पद्धतीने चालविली जाते. संतसेना नाभिक युवक संघटना सक्रिय आहे. समाजबांधवांचा कोणताही प्रश्न तयार झाला, तर त्यांच्या मदतीला संघटना धावून जाण्याचे काम करते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही २२ लाख रुपयांची व्यवयासाला पूरक यंत्रे मिळवून देण्यात आली आहेत.एक दृष्टिक्षेपकोल्हापूर शहरातील सलून दुकाने : ११००जिल्ह्यातील सलून दुकाने : ४२००बहुतांशी दुकाने : सलूनच्या तीन खुर्च्या असलेलीसुमारे १० टक्के दुकाने वातानुकूलितस्वच्छता व विनम्र सेवेला प्राधान्यअत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापरग्राहकाच्या आरोग्याकडे लक्ष‘सलून’वालाच मुलगा हवा..समाजात आता शेतकरी मुलगा नको, अशी वृत्ती आहे तसाच अनुभव मोठ्या प्रमाणावर नाभिक समाजातील तरुणांनाही येतो. समाजातील मुलींना सलूनवाला मुलगा नको आहे. ही स्थिती बदलण्याचे नाभिक महामंडळाने मनावर घेतले आहे.या समाजातील तरुणांना सलूनचे उत्तमातील उत्तम प्रशिक्षण देऊन स्वत:च्या भक्कम पायावर उभे करण्याचे प्रयत्न आहेत. त्याला यश येऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात सलूनवालाच मुलगा पाहिजे, अशी स्थिती निर्माण होईल, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष सयाजी झुंझार यांनी व्यक्त केली.
‘पार्लर’ शब्दाआडून आमची बदनामी करू नका
By admin | Published: May 21, 2017 12:39 AM