लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात अजूनही लाॅकडाऊन आहे. जिथे लाॅकडाऊनमध्ये सूट दिलेली आहे, तेथेही उद्योगधंदे चालू नाहीत. आजही लोकांच्या हाताला काम नाही, अशी परिस्थिती आहे. गरीब मध्यमवर्ग यांना रोजचे जीवन जगायला पैसे नाहीत. ते महावितरण कंपनीची वीजबिले कशी भरणार? अशी स्थिती असल्याने घरगुती ग्राहकांची कनेक्शन तोडू नयेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने विक्रांत पाटील यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच वीज ग्राहक वीजबिले भरण्याच्या बाबतीत राज्यात अग्रक्रमावर आहेत. महामारीमुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पहिल्या लाटेपासून सामान्य जनतेने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीजबिल सवलतीसाठी आंदोलने केली आणि घरगुती ग्राहकांना शेजारील राज्यांप्रमाणे वीजबिल सवलत मिळावी, अशी सातत्याने मागणी केली. सरकारनेही त्याबद्दल तयारी दाखविली, पण प्रत्यक्षात मदत केली नाही. आता दुसरी लाट असल्याने अनेक महिने सर्व व्यवहार बंद आहेत. सध्या सामान्य वीज ग्राहक अडचणीत असल्याने त्याबाबत विचार करून त्यांना त्रास होणार नाही, अशा प्रकारचे धोरण राज्य शासनाने ठरवावे. माणुसकीच्या नात्याने गरीब व कृषिपंपधारकांची वीज कनेक्शन तोडू नयेत. महारामारीमध्ये सर्वांत जास्त फटका हा या वर्गाला बसला आहे. ग्रामपंचायत पिण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची वीज कनेक्शनही महावितरणने थकबाकीसाठी तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे गावागावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली.