कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही, ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग आहे तेथील स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार व अभ्यास करून कोणताही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा. घाईघाईने व्यवहार खुले करू नका, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रप्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आतापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामग्री उपलब्ध करा. रुग्णालयांसाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा. संसर्गाचे वाढते प्रमाण व तिसरी लाट लक्षात घेवून जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील. याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असेही ते म्हणाले. ----
सात जिल्ह्यांचा दर तिप्पट
आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सातही जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०.१५ इतका कमी झाला आहे. मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट असल्याचे सांगितले. तर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल. तसेच या जिल्ह्यांना आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील असे सांगितले.
--
ऑक्सिजनबाबत स्वावलंबी व्हा..
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मोठ्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबतदेखील संवाद साधला. यात कोल्हापूरातील उत्पादक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात रोज १३०० टन ऑक्सिजन निर्मिती होत असूनही हे प्रमाण ३ हजार टनापर्यंत वाढवण्याचा उद्देश आहे. काही जिल्ह्यात आज ही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा नवा विषाणू आढळला असून त्याची घातकता आपल्याला माहिती नाही, त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन आता आपल्या हाती असलेल्या कालावधीत ऑक्सिजनबाबत स्वावलंबी व्हा, अशी सूचना केली.
---