सडोली (खालसा) : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करीत असून, प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा, हे न थांबल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढू, असा दम महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, रविवारी येथे दिला. ते हळदी (ता. करवीर) येथे करवीर तालुक्यातील ४० गावांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश व शेतकरी मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हाळवणकर होते.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सन्मान देऊन विकास करणारा पक्ष आहे. करवीर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला असून, भविष्यात अनेक नेतेमंडळी भाजपच्या वाटेवर आहेत. हसन मुश्रीफ यांनी के.डी.सी.सी. बँकेच्या राजकरणात पी. एन. पाटील यांच्याशी बँक व भोगावती अशा फॉर्म्युल्यानुसार वाटणी करून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हंबीरराव पाटील व नामदेव पाटील यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा बळी देऊन स्वत:चा राजकीय स्वार्थ साधला.यावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांचेही भाषण झाले. मेळाव्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटक ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, के. एस. चौगले, प्रताप कोंडेकर, संभाजीराव पाटील, शिवाजी बुवा, वसंत पाटील, अजय चौगले, भिकाजी जाधव, अनिल देसाई, आदी उपस्थित होते....तर पी. एन. यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबाकोल्हापूर जिल्हा बँकेत मुश्रीफांच्या काळात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या हातात बँक सुरक्षित राहणार नाही. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी पी. एन. पाटील तयार असतील तर बँकेच्या हितासाठी भाजप आघाडीचे सर्व सहा संचालक पी. एन. पाटील यांना बिनशर्त पाठिंबा देतील, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी गुगली टाकली आहे.राष्ट्रवादी-शेकापच्या कारनाम्यांमुळे ‘भोगावती’त पराभवसरकारची ताकद कारखान्याच्या प्रगतीसाठी लावता येईल म्हणून भोगावती कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शेकापशी युती केली. मात्र, राष्ट्रवादी-शेकापच्या संचालकांनी केलेल्या कारनाम्यांमुळे पराभव झाला. यापुढे हंबीरराव पाटील यांसारखे कार्यकर्ते घेऊन ‘भोगावती’त कार्यरत राहू, असे आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले.मुश्रीफांच्या फिक्सिंगमुळे कार्यकर्त्यांची फरफटजिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर पहिली दोन वर्षे मुश्रीफांना व त्यानंतरपी. एन. पाटील यांना अध्यक्ष करायचे असे ठरले होते. मात्र,मुश्रीफांनी ते आपल्याकडेच राहावे यासाठी पी. एन. पाटील यांना भोगावती व जिल्हा परिषद निवडणुकीत परितेत छुपा पाठिंबा दिला. मुश्रीफांच्या फिक्सिंगमुळेच हंबीररावांसारख्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची फरफट झाली.
धमकावू नका, गैरव्यवहार बाहेर काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:02 AM