लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर केवळ स्वार्थासाठी केला जात आहे. लढाई, मुत्सद्देगिरी, व्यवस्थापन कौशल्य आणि रयतेचा विश्वास या जोरावर महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मात्र आता त्यांना देवपण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा मिथकांवर विश्वास न ठेवता महाराजांच्या कार्याची प्रेरणा पिढ्यान्पिढ्या मिळण्यासाठी त्यांना देव करू नका, असे आवाहन प्रा. डॉ. आनंद पाटील यांनी केले. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने बुधवारपासून शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, अशोक देशमुख, शैलजा भोसले, रामचंद्र यादव उपस्थित होते. पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य आणि गरीब जनतेला सोबत घेऊन स्वराज्याचा संकल्प केला. सैन्यातील अधिकारी व मावळे निवडताना त्यांनी केवळ गुणवत्तेला प्राधान्य दिले. माणसांची जात, धर्म, वंश पाहिला नाही. म्हणूनच त्यांच्या ३३ सुरक्षारक्षकांपैकी ११ सुरक्षारक्षक हे मुस्लिम समाजाचे होते. समोर हजारोंच्या संख्येने शत्रुसेना असतानाही शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांच्या जोरावर लढाया जिंकल्या याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपला राजा स्वत: स्वराज्यासाठी लढतोय, हे पाहून मावळ्यांनाही स्फूरण चढायचे. महाराजांनी मुत्सद्देगिरीने शत्रूला नामोहरम केले. ते म्हणाले, सांस्कृतिक सत्ता ही राजसत्तेपेक्षा प्रबल असते. आपल्याकडे इतिहासाची माहिती सांगणारी साधने जपली गेली नाहीत; त्यामुळे लिहिता-वाचता येणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या सोयीने इतिहास लिहिला. आपल्याला अनेकदा शिवाजी महाराजांचा खोटाच इतिहास सांगितला गेला. मिथकं आणि इतिहासामध्ये पुसटशी रेषा असते. मिथकांवर विश्वास ठेवला की आपण गुलाम होतो आणि खरा इतिहास अंधारातच राहतो. या मिथकांनी शिवाजी महाराजांना देवपण देण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेमागील भूमिका विशद केली. आजचे व्याख्यानविषय : छत्रपती शिवाजी महाराज : प्रतिमा व राजकीय व्यवहार. वक्ते : प्रा. डॉ. प्रकाश पवार
छत्रपती शिवाजी महाराजांना देव करू नका
By admin | Published: June 01, 2017 12:45 AM