शिरगाव : मौजे शिरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम अन्यत्र हलवू नये, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सरपंच रूपाली व्हरकट यांचे पती राजेंद्र व्हरकट यांनी राधानगरी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. शिरगाव ग्रामपंचायतीची नवीन इमारतीचे विविध योजनातून मिळालेल्या निधीतून बांधकाम चालू आहे. परंतु नवीन इमारत बांधकाम तांत्रिक अडचण व इतर चुकीची करणे दाखवून दुसरीकडे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी काही जणांनी केली आहे. शिरगाव गावचा भौगोलिक विचार करता इतरत्र कुठेही पुरेशी जागा उपलब्ध नाही, तरी जिथे जुनी इमारत आहे, त्याठिकाणी पुरेशी व मुबलक जागा उपलब्ध आहे. येथे बांधकाम करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम आहे, त्याचठिकाणी व्हावे, अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.
गावातील सर्व विकासकामांमध्ये अडथळा आणण्याचे काम व शासनाची फसवणूक करण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने लोकांची दिशाभूल करून सह्या घेत बांधकाम हलवण्याची मागणी केली आहे, असे व्हरकट यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.