कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीत केवळ ६५ टक्के भागात ड्रेनेजलाईन असणे ही बाब गंभीर आहे. सर्वाधिक प्राधान्य देऊन आधी ज्या भागात ड्रेनेजलाईन नाही, त्या भागात ड्रेनेजलाईन घाला, त्याच्या निविदा येत्या सहा महिन्यांत निघाल्या पाहिजेत, असे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला दिले. पंचगंगा नदीचे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर आता नोटिसा काढण्याचे बंद करून थेट मालकांवरच गुन्हे दाखल करा, कारखाने बंद करा, असे आदेशही कदम यांनी यावेळी दिले. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत शनिवारी शासकीय विश्रामगृहावर पर्यावरणमंत्री कदम यांनी महसूल विभाग, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, जिल्हा परिषद, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आदी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाची व्याप्ती, त्याला जबाबदार असणाऱ्या घटकांची माहिती आणि प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर कदम यांनी वरील आदेश दिले. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीतून शहरात ६५ टक्के भागातच ड्रेनेजलाईन असल्याचे आणि उर्वरित भागातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नाल्यावाटे नदीत मिसळत असल्याची बाब समोर येताच कदम यांनी अधिकाऱ्यांनाच फैलावर घेतले. मंत्री संतप्त इचलकरंची शहरातील काळाघोडा नाल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची तीव्रता लक्षात आणून देताच मंत्री कदम संतप्त झाले. इचलकरंजीतील तसेच नदीकाठावर असणारे कोणते कारखाने विनाप्रक्रिया सांडपाणी नदीत सोडतात याची पाहणी करा, त्यांच्या सांडपाण्याचे नमुने घ्या आणि आता प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना नोटीस देण्याचे थांबवा. थेट त्यांच्यावर कारवाई करा. गुन्हे दाखल करा. कारखाने बंद करा. दहा- पंधरा कारखानदारांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय दूषित सांडपाणी थेट नदीत सोडण्याचे त्यांचे पुन्हा धाडस होणार नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने सर्व्हे करावा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे यांनी १७४ गावांपैकी ३९ गावांतील पाणी नदीत मिसळते, बाकीच्या गावांचे पाणी जमिनीत मुरते असे सांगताच कदम यांनी त्यांना दम भरला. जमिनीत पाणी मुरते का ओढ्याद्वारे नदीत मिसळते याचा येत्या पंधरा दिवसांत सर्व्हे करण्यात यावा, त्याचा अहवाल आपणास सादर करावा, असे कदम यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत खासदार राजू शेट्टी, आमदार राजेश क्षीरसागर, आ. सुरेश हाळवणकर, आ. सुजित मिणचेकर,आ. उल्हास पाटील आदींनी सूचना केल्या. बैठकीस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पी. अनबनगल, जिल्हाधिकारी अमित सैनी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, उपजिल्हाधिकारी कुलकर्णी, प्रांत प्रशांत पाटील, प्रादेशिक अधिकारी शिवांगी, मनपा उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नोटिसा नको, गुन्हे नोंदवा
By admin | Published: April 24, 2016 12:49 AM