आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0८ : शाहू कॉलनी, विक्रमनगर येथे रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा लवकर उघडला नसल्याच्या रागातून तरुणाने वडिलांचा चाकूने भोकसून खून केला. पिरसाब महंमद मुल्ला (वय ५५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित रफिक पिरसाब मुल्ला (३०) याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकूही जप्त केला. ही घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी, पिरसाब मुल्ला यांचे विक्रमनगर शाहू कॉलनीत दुमजली कौलारू घर आहे. ते सेंट्रिंगचा व्यवसाय करीत होते. पत्नी, दोन मुले, मुलगी असे पाचजणांचे कुटुंब. पाच वर्षांपूर्वी थोरला मुलगा रफिक याचे लग्न केले. त्याला दोन मुले आहेत. रफिकदेखील सेंट्रिंगचा व्यवसाय करतो. तो दारूच्या आहारी गेल्याने नेहमी घरी उशिरा यायचा. घरी आल्यानंतर त्याचा आई-वडिलांसह पत्नीशी वाद होत असे. रफिक रविवारी सकाळी सेंट्रिंगच्या कामासाठी बाहेर पडला. नेहमीप्रमाणे रात्री अकरापर्यंत तो घरी न आल्याने त्याला बाहेरच राहू दे, असा निर्णय घेत वडिलांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास तो दारू ढोसून घरी आला.
दरवाजा बंद असल्याने त्याने दरवाजा उघडण्यासाठी हाक मारली. त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून घरातील लोकांनी बराचवेळ दरवाजा उघडलाच नाही. त्यानंतर त्याने दरवाजावर जोरात लाथा मारत ओरडायला सुरुवात केली. अखेर वैतागून वडील पिरसाब यांनी दरवाजा उघडत इतका वेळ कोठे होतास, अशी विचारणा केली. त्यावर मला कोण विचारणारा, दरवाजा लवकर उघडला नाहीस काय, तुला आता सोडत नाही, असे म्हणून जवळ असलेला चाकू बाहेर काढून त्यांच्या पोटात, छातीवर, कंबरेवर चार गंभीर वार केले. काही क्षणातच ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
रफिक याचा रुद्र अवतार पाहून जिवाच्या भीतीने घरातील इतर सर्वजण आरडाओरड करीत बाहेर पळत आले. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे लोक धावत घरी आले. शब्बीर वाटंगी यांनी रफिकला पकडले, तर राजू पाटील यांनी त्याच्या हातातील रक्ताने माखलेला चाकू काढून घेतला. यावेळी या दोघांना हिसडा मारून तो पळून गेला. गंभीर वार झाल्याने पिरसाब बेशुद्ध पडले होते. शेजारील लोकांनी त्यांना रिक्षातून तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
घरातील साहित्याची तोडफोड पळून गेलेला रफिक पुन्हा घरी आला. त्याने बेफाम होत पत्नी, बहीण, भावाला शिवीगाळ करीत घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. या प्रकाराची माहिती नागरिकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांना दिली. ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. पोलीस आल्याची चाहूल लागताच रफिकने अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्याचा शोध घेतला असता तो विक्रमनगर गल्ली नं. ३ मध्ये लपून बसलेला मिळून आला. यावेळी त्याने पोलिसांशीही हुज्जत घातली.
सराईत गुन्हेगार
रफिक मुल्ला हा सेंट्रिंगचा व्यवसाय करीत असला तरी त्याचा गुन्हेगारी टोळीमध्ये सक्रिय सहभाग असायचा. विक्रमनगरमध्ये गुंड संजय निरंगे व लखन कांबळे या दोन गुंडांच्या टोळीमध्ये वर्चस्व वादातून खुनी हल्ला झाला होता. त्यामध्ये रफिकवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुंड निरंगे, बबलू माने, शरद पाटील यांच्या टोळीमध्ये तो सदस्य आहे. सगळं सांगण्यासारखं नाही रफिक याने वडिलांवर अतिशय क्रुरपणे वार केले आहेत. इतकी खुन्नस काय होती? असा प्रश्न पोलिसांनी त्याला केला. त्यावर साहेब, कौटुंबिक वाद आमच्यात आहे. सगळंच सांगण्यासारखं नाही, असे सांगून तो शांत झाला.