कोल्हापूर म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी नातेवाईकांना परस्पर सीपीआरकडे पाठवू नये असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी सर्व खासगी रुग्णालयांना शनिवारी पाठवले आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी सीपीआरच्या औषध भांडारासमोर येऊन रात्री रांगेत झोपण्याची वेळ आली. यामुळे डॉ. माळी यांनी नातेवाईकांना पाठवू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
या आजारावरील इंजेक्शनची टंचाई असल्याने सध्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून सीपीआरला इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. तेथून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये जेथे हे रुग्ण दाखल आहेत त्यांना आधी पुरवठा केला जातो. यानंतर उर्वरित इंजेक्शन पैसे भरून घेवून खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी नातेवाईकांना विकत दिली जातात.
मात्र या इंजेक्शनसाठी नातेवाईकांना सीपीआरच्या औषध भांडारासमोर रात्री येवून रांग लावावी लागत आहे. टंचाईमुळे या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याचीही चर्चा असून नातेवाईकांची धावपळ थांबवण्यासाठी सीपीआर प्रशासनाने हे पत्र शनिवारी काढले आहे.
त्यानुसार ज्या खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल आहे त्यांनी रुग्णाची सविस्तर माहिती, अहवाल, इंजेक्शनची मागणी लेखी स्वरूपात कळवायची आहे. त्यानंतर इंजेक्शन उपलब्ध असतील तर तेवढी रक्कम भरावयाची आहे. त्यानंतर ही इंजेक्शन त्यांना दिली जाणार आहेत. तसेच ज्या रुग्णासाठी हे इंजेक्शन दिले आहे त्याच्यासाठीच वापरणार असल्याचे लेखी हमीपत्रही रुग्णालयाला द्यावे लागणार आहे.
चौकट
जिल्ह्यात ८४ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसच्या ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ६८ जण सीपीआरमध्ये दाखल असून ३६ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १०९ जणांना या आजाराची लागण झाली असून यातील १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.